>> रंगपंचमीनंतर उतरले होते पाण्यात; एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश
रंगपंचमी साजरी करून शुक्रवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास गांजे-उसगाव येथील म्हादई नदीत आंघोळीसाठी उतरलेल्या दोघा परप्रांतीय तरुणांचा बुडून मृत्यू झाला, तर एका तरुणाला वाचवण्यात यश आले. या घटनेत प्रकाश शंकरप्पा हडपड (22) आणि शरणप्पा संगप्पा हडपड (21, दोघेही सध्या रा. खडपाबांध-फोंडा, मूळ कर्नाटक) यांचा बुडून मृत्यू झाला. देवानंद हडपड (18) या तरुणाला सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात स्थानिक लोकांना यश आले. दरम्यान, रंगपंचमी आणि वाढत्या गर्मीमुळे शुक्रवारी दिवसभर दूधसागर नदी व म्हादई नदीवर लोकांची गर्दी उसळली होती.
प्राप्त माहितीनुसार, फोंडा परिसरात शुक्रवारी सकाळी रंगपंचमी साजरी करून 4 तरुणांचा गट गांजे येथे आंघोळीसाठी गेला होता. त्यावेळी नदीवर मोठी गर्दी होती. सदर चौघे तरुण आंघोळीसाठी नदीत उतरले. त्यावेळी प्रकाश हडपड याचे वडील व अन्य काही जण तेथे दाखल झाले. प्रकाश हडपड याला त्याच्या वडिलांनी अधिक पाण्यात न जाण्याचा सल्ला दिला होता; पण वडिलांची नजर चुकवून तो खोल पाण्यात गेला. तो बुडत असल्याचे पाहून त्याला बाहेर काढण्यासाठी शरणप्पा हडपड व देवानंद हडपड यांनी प्रयत्न केला. मात्र ते दोघे देखील बुडू लागले. तेव्हा त्याच ठिकाणी आंघोळ करणाऱ्या तिराळ-उसगाव येथील युवकांनी पाण्यात बुडणाऱ्या तिघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; पण केवळ देवानंद हडपड याला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर पाण्यात बुडालेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यात आला. फोंडा अग्निशमन दलाचे वाहन पोहोचेपर्यंत स्थानिक युवकांनी पाण्यात बुडालेल्या दोन्ही तरुणांना बाहेर काढून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; पण डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात हडपड कुटुंबीय व त्याच्या मित्र परिवाराने गर्दी केली. फोंड्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गावकर यांनी घटनेचा पंचनामा करून संध्याकाळी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मडगाव येथील इस्पितळात दाखल केले.