
स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदाल याने काल सोमवारी युक्रेनच्या आलेक्झांडर दोल्गोपोलोव याचा ६-२, ६-४, ६-१ असा १०१ मिनिटांत पराभव करत युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
तेराव्या मानांकित पेट्रा क्विटोवाने सनसनाटी निकाल नोंदविताना चौथ्या फेरीत तिसर्या मानांकित गार्बिन मुगुरुझा हिला ७-६, ६-३ असे सरळ दोन सेटमध्ये बाद केले. हा सामना १ तास ४६ मिनिटे चालला. उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना नवव्या मानांकित व्हीनस विल्यम्सशी होणार आहे.
सानिया-पेंग उपांत्यपूर्व फेरीत
महिला दुहेरीच्या तिसर्या फेरीत सानिया मिर्झा व तिची चीनी साथीदार शुई पेंग या चौथ्या मानांकित जोडीने रोमानियाच्या सोराना सर्स्टिया व स्पेनच्या सारा सोरिबेस टोर्नो यांना ६-२. ३-६, ७-६ असे हरवून चौथी फेरी गाठली. या फेरीत या द्वयीला टिमिया बाबोस (हंगेरी) व अँड्रिया लावाकोवा (झेक प्रजासत्ताक) या पाचव्या मानांकित जोडीशी किंवा सू वेई से (तैवान) व मोनिका निकुलेस्कू (रोमानिया) या १२व्या मानांकित जोडीशी सामना करावा लागणार आहे. पुरुष दुहेरीत मात्र लिएंडर पेस व पूरव राजा यांना दुसर्या फेरीत हार पत्करावी लागली. कॅरेन खाचानोव व आंद्रे रुबलेव या रशियन जोडीने भारतीयांचा ६-४, ७-६ असा पाडाव केला.
बोपण्णा- दाब्रोवस्की अंतिम आठांत
रोहन बोपण्णा व गेब्रिएला दाब्रोवस्की या इंडो-कॅनडियन जोडीने दुसर्या फेरीचा अडतला पार करत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सातव्या मानांकित या जोडीने दुसर्या फेरीत मारिया जुझे मार्टिनेझ सांचेझ (स्पेन) व निकोलस मन्रो (अमेरिका) यांना ६-३, ६-४ असे नमविले. उपांत्यपूर्व फेरीत त्यांचा सामना तिसर्या मानांकित हाओ चिंग चान (तैवान) व मायकल व्हीनस (न्यूझीलंड) या जोडीशी होणार आहे.
दिवस सातवा ः निकाल ः पुरुष एकेरी ः चौथी फेरी ः पाब्लो कारेनो बुस्टा (१२) वि. वि. डॅनिस शापोवालोव ७-६, ७-६, ७-६, सॅम क्वेरी (१७) वि. वि. मिश्चा झ्वेरेव (२३) ६-२, ६-२, ६-१, केव्हिन अँडरसन (२८) वि. वि. पावलो लॉरेन्झी ६-४, ६-३, ७-६, ६-४, महिला एकेरी ः चौथी फेरी ः अनास्तासिया सेवास्तोवा (१६) वि. वि. मारिया शारापोवा ५-७, ६-४, ६-२, व्हीनस विल्यम्स (९) वि. वि. कार्ला सुआरेझ नवारो ६-३, ३-६, ६-१, ज्युलिया जॉर्जेस (३०) पराभूत वि. स्लोन स्टीफन्स ६-३, ३- ६, ६-१