म्हादईप्रश्नी गोवा काँग्रेस पक्ष कर्नाटकला कधी पत्र पाठवणार?

0
4

>> रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे प्रमुख मनोज परब यांचा सवाल

जमीन घोटाळ्यातील फरार झालेल्या संशयित आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याला पकडण्यात मदत करावी, या मागणीसाठी गोवा काँग्रेसने कर्नाटकच्या मंत्र्यांना पत्र पाठविले होते. मात्र, काँग्रेस पक्ष म्हादई मुद्द्यावर कर्नाटक सरकारला पत्र का पाठवत नाही? असा प्रश्न रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे (आरजीपी) प्रमुख मनोज परब यांनी पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल उपस्थित केला.
राष्ट्रीय पक्ष गोव्यातील लोकांना संपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या पक्षांना मत म्हणजे गोवा नामशेष होण्याच्या बाजूने मतदान करण्यासारखे आहे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील आघाडी केवळ राजकीय स्वार्थासाठी होती, असा आरोपही मनोज परब यांनी केला. तसेच, आरजीपीला भाजपची बी टीम म्हणणारे नेते आता कुठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

आरजीपी आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत लवकरच निर्णय घेणार आहे. पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात झाली असून, पक्षाच्या सदस्य नोंदणीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे, असेही मनोज परब यांनी सांगितले.
आरजीपी पक्षाच्या जमीन संरक्षण आणि संवर्धन विधेयकाला कोणत्याही राजकीय पक्षाने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे बिगर गोमंतकीय आमची जमीन विकत घेत आहेत. प्रत्येक आमदाराने गोव्यातील जमिनीचे संरक्षण कसे करायचे, यावर स्पष्ट भूमिका घेण्याची गरज आहे. राज्यातील सामान्य नागरिक जमीन खरेदी करू शकत नाहीत; कारण किंमत आवाक्याबाहेर आहेत, असेही आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले.