>> समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांची पत्रकार परिषदेत माहिती; शुक्रवारी गुलालोत्सव; विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचीही रेलचेल
1989 मध्ये गोव्याच्या राजधानीत पणजी शिगमोत्सव समितीतर्फे प्रथम सुरू झालेला शिगमोत्सव यंदा 37 व्या वर्षात पदार्पण करत असून, यंदाही शुक्रवार दि. 14 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत आझाद मैदानावर ओम बिट्स वाद्यवृंदाच्या तालावर रंगपंचमीदिनी गुलालोत्सव साजरा होणार आहे. त्यात धर्म, जातीभेद, विसरुन आबालवृद्ध, महिला सहभागी होतील. 19 मार्चपासून आझाद मैदानावर दररोज संध्याकाळी 7 वाजता विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम सादर होतील. शनिवार दि. 22 मार्च रोजी संध्याकाळी 3.30 वाजल्यापासून जुन्या सचिवालयाकडील डी. बी बांदोडकर मार्गावरील भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याकडून रोमटामेळ, चित्ररथ, लोकनृत्य, वेशभूषा आदींचा समावेश असलेली भव्य मिरवणूक निघेल.
पणजी शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो यांनी काल पत्रकार परिषदेत शिगमोत्सवा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, समितीचे कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक व सचिव शांताराम नाईक उपस्थित होते.
गोव्याच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन पणजी शहरात घडावे या उद्देशाने पणजी शिगमोत्सव समितीतर्फे पणजीत सुरू झालेला हा उत्सव लोकप्रिय झाला व राज्य उत्सव बनला आणि आज तो गोव्याच्या विविध भागांत अशा पद्धतीने साजरा केला जातो याचा आनंद आहे, असे श्रीनिवास धेंपो यांनी सांगितले. यंदा 10 लाख 27 हजार रुपयांची बक्षिसे विविध स्पर्धांसाठी देण्यात येतील.
शुक्रवार दि. 14 रोजी संध्याकाळी 7 वाजता सांज मेलोडीज ऑर्केस्ट्रा सादर होईल. त्यात हिंदी सिनेगीते, नृत्य याचा आविष्कार असेल. दि. 19 रोजी संध्याकाळी 7 वाजता ओंकार मेलोडिज ऑर्केस्ट्रा सादर होईल. त्यात मैबाम कुंजराज (मणिपूर), दीपश्री शानबाग (मुंबई), ऋतुजा लोटलीकर, प्रतीक्षा कोरगावकर व प्रसन्न भेंडे (गोवा) हे गायक आणि स्वाती आणि सेजल (मुंबई) या नृत्यांगना सहभागी होतील. दि. 20 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता राजदीप नाईक निर्मित व श्रीनिका क्रिएशन नागेशी प्रस्तुत ‘मिस्टर अँड मिसेस दाबोलकर’ हे कोकणी विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे.
दि. 21 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता निषाद क्रिएशन प्रस्तुत मराठी भावगीते, भक्तिगीते, चित्रपटगीते, युगुलगीतांचा संगम असलेला ‘रुपेरी वाळूत’ हा बहारदार कार्यक्रम होईल. त्यात प्रणय पवार (मुंबई), नामवंत सुगम आणि गझल गायिका वर्षा जोशी (संभाजीनगर), कल्पा सायनेकर व सिया काकोडकर (गोवा) या गायक कलाकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील नामवंत निवेदक प्रफुल्ल वालावलकर हे निवेदन करतील.
दि. 23 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता ‘एकापेक्षा एक अप्सरा’ हा बाबा पठाण निर्मित पुणे येथील लावणीचा समारोपाचा कार्यक्रम रंगणार आहे. त्यात नृत्य चंद्रिका भाग्यश्री नगरकर, नृत्य बिजली सुनीता पाटील, संगीता जाधव, लावण्य सुंदरी स्नेहल व वन्समोर क्वीन लंका जावळे या खास आकर्षण असतील.
चित्ररथ, रोमटामेळ पथकांना आवाहन
चित्ररथ, रोमटामेळ पथकांनी वेळेत आपले सादरीकरण करून सहकार्य करावे. कारण आबालवृद्ध तासन्तास चित्ररथ पाहण्यासाठी तिष्ठत उभे असतात व मग त्यांचा विरस होतो, असे आवाहन मंगलदास नाईक यांनी केले.