आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयोजित करत असलेल्या आघाडीच्या स्पर्धांमध्ये विश्वचषकानंतर एखाद्या स्पर्धेचा क्रमांक लागत असेल, तर ती म्हणजे चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेचे एक वेगळेपण आहे. हेच वेगळेपण या स्पर्धेला विश्वचषकाहून वेगळे बनवते. विश्वचषकामध्ये आयसीसीकडून अनेक कमकुवत संघांनादेखील व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने संधी देण्यात येते, परंतु चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याच्या नावाप्रमाणेच चॅम्पियन संघांनाच संधी दिली जाते. स्वतःचे कर्तृत्व दीर्घकाळ सिद्ध करून आयसीसी क्रमवारीत पहिल्या आठ स्थानांवर असलेले संघ या स्पर्धेत आपले कौशल्य पणाला लावतात. त्यामुळे या स्पर्धेत केवळ छोटीशी चूक बलाढ्य संघाला स्पर्धेबाहेर नेण्यास पुरेशी ठरते. या वेळेस पाकिस्तानच्या यजमानपदाखाली ही स्पर्धा झाली खरी, परंतु दुबईत अंतिम सामना खेळून भारताने विजेतेपदाला गवसणी घातली. याला कारणही तसेच होते. सुरक्षेचे कारण देताना बीसीसीआयने पाकिस्तानात खेळणार नसल्याचे स्पष्ट केल्याने आयसीसीचा नाईलाज झाला व भारताचा समावेश असलेले सर्व सामने दुबईत झाले. यजमान असूनही पाकिस्तानमध्ये केवळ एकच उपांत्य सामना झाला, तर दुसरा उपांत्य सामना व अंतिम सामना दुबईत खेळविण्यात आला. स्पर्धेचे यजमान असूनही अंतिम सामना दुसऱ्या देशात होण्याची क्रिकेटच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ होती. भारतीय क्रिकेट संघाने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती, तर 2017 साली पाकिस्तानकडून भारताचा पराभव झाला होता. यावेळेस स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला माघार घ्यावी लागली होती. दीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन गेलेल्या महंमद शमीवर प्रमुख जलदगती गोलंदाजाची भूमिका बजावण्याची मोठ्ठी जबाबदारी टाकण्यात आली होती. त्याच्या जोडीला हर्षित राणा होता. महंमद सिराजला डच्चू देऊन ‘केकेआर’चा असल्याने राणाला निवडल्याची टीका प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर झाली होती. स्पर्धेपूर्वीच वातावरण बिघडलेले असताना टीम इंडियाने आपल्या जाहीर केलेल्या संघात एक बदल केला. अतिरिक्त सलामीवीर यशस्वी जयस्वाल याच्या जागी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आले. संघात फिरकीपटूंची फौज असताना अजून एक फिरकीपटू कशाला हवा, असा सवाल क्रिकेटपंडितांनी उपस्थित केला होता. केवळ टी-20 मधील काही मोजक्या सामन्यांच्या अनुभवाच्या जोरावर त्याला संघात निवडण्याचा जुगार गंभीरने खेळला होता. गंभीरने पत्करलेला हा धोका मास्ट्ररस्ट्रोक ठरला. अक्षर पटेल व रवींद्र जडेजा हे दोन्ही डावखुरे फिरकीपटू एकाचवेळी संघात कसे खेळतील याचे उत्तरही गंभीरने या स्पर्धेत दिले. अक्षरला पाचव्या स्थानावर फलंदाजीस उतरवून फलंदाजी फळीतील खोली वाढवताना भारताला प्रत्येक सामन्यात सहा गोलंदाजांचा पर्याय मिळेल याची दक्षता घेतली. फलंदाजी विभागात रोहित शर्मा, विराट कोहली हे अनुभवी शिलेदार व गिलच्या रुपात युवा खेळाडूने आवश्यकतेवेळी योगदान दिले. परंतु, संघाला जोडण्याचे काम मधल्या फळीत अक्षर पटेल व श्रेयस अय्यर यांनी खऱ्या अर्थाने केले. भारताने या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासापर्यंत बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया यांचा पराभव केला. अंतिम फेरीत पुन्हा किवीज संघाला मात देत भारताने झळाळता करंडक उंचावला. आयसीसीच्या मागील प्रत्येक अंतिम सामन्यात वैयक्तिक कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या रोहितने हे अपयश मागे सारून केलेली अर्धशतकी खेळी महत्त्वाच्या अंतिम सामन्यात विजयाचा पाया रचण्यासाठी पुरेशी ठरली. अपेक्षांचे ओझे असताना तसेच युवा ऋषभ पंत दरवाजा ठोठावत असताना यष्टिरक्षकाची भूमिका चोख बजावत केएल राहुलने वनडे क्रिकेटमध्ये सध्यातरी आपल्याला पर्याय नसल्याचे दाखवून दिले. स्पर्धा सुरू असताना काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा महंमद यांनी रोहित शर्मा याच्यावर सडकून टीका केली होती. रोहित शर्मा हा ‘लठ्ठ’ असल्याचे त्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिताना रोष ओढवून घेतला होता. आपला राष्ट्रीय संघ एवढ्या मोठ्या पातळीवर खेळत असताना संघाच्या नेत्याचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांनी साधलेली वेळ काँग्रेसला मान खाली घालायला लावण्यास पुरेशी ठरली. टीम इंडियावर मैदानाबाहेरच्या या वादविवादांचा काडीमात्र परिणाम झाला नाही. त्यामुळेच टीम इंडिया ही ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ बनली. मुश्फिकुर रहीम, स्टीव स्मिथ यांनी निवृत्ती स्वीकारल्यामुळे भारताच्या या जेतेपदानंतर रोहित शर्माच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, हिटमॅन रोहितने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.