>> निषेध सभेत मागण्या त्वरित मान्य करण्याची मागणी
कदंब महामंडळाच्या चालक व इतर कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी येथील कदंब बसस्थानकावर काल एक निषेध सभा घेतली. कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य करा; अन्यथा येत्या 19 मार्चपासून संपावर जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी कदंब कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवार दि. 11 मार्च रोजी पाटो-पणजी येथील श्रमशक्ती भवनातील कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
प्रलंबित मागण्यांची पूर्तता न केल्यास येत्या 19 मार्चपासून बेमुदत संप पुकारण्याची नोटीस कदंब महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे. कर्मचारी संघटनेने संपाची नोटीस देऊन सुध्दा प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याने कामगारांनी कदंब बसस्थानकावर निषेध सभा घेऊन आपल्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारी यंत्रणेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, कामगार नेते प्रसन्न उटगी, ॲड. सुहास नाईक, कदंब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर व इतरांची उपस्थिती होती.
कदंब कामगारांनी संपाची नोटीस दिल्यानंतर सुध्दा सरकारी यंत्रणेला जाग आलेली नाही. त्यामुळे आपण श्रमशक्ती भवनातील कामगार आयुक्त कार्यालयाच्याबाहेर एक दिवसाचे उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही फोन्सेका यांनी सांगितले.
कदंब कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगाची 34 महिन्यांची थकबाकी त्वरित द्यावी, 12 टक्के भविष्यनिर्वाह निधी योगदान पुन्हा सुरू करावे, 300 नवीन डिझेल बसेस तातडीने खरेदी कराव्यात, इलेक्ट्रिक बसगाड्या कदंब महामंडळाने चालवाव्यात, इलेक्ट्रिक बसगाड्या चालविण्यासाठी खासगी एजन्सीकडे देऊ नयेत, गेली कित्येक वर्षे काम करणारे चालक आणि वाहकांना सेवेत नियमित करावे, माझी बस योजना तात्काळ बंद करावी, कदंबमध्ये बसगाड्यांची देखभाल करण्यासाठी आणखी तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या कदंब कर्मचाऱ्यांच्या आहेत.