>> समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती; संबंधितांकडून रक्कम वसुली सुरू
समाजकल्याण खात्याकडून राबवल्या जाणाऱ्या दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत (डीएसएसएस) 6,000 बोगस किंवा मृत पावलेले लाभार्थी आढळून आले असून, त्यांच्याकडून योजनेची रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.
समाजकल्याण खात्याच्या डीएसएसएस योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी केली जात आहे. त्यात बोगस किंवा मृत झालेले लाभार्थी आढळून आल्यास त्यांच्याकडून मानधन वसूल करण्याची प्रक्रिया केली जात आहे. अशा प्रकरणांमध्ये यापूर्वी 13 कोटी रुपये वसूल केले आहेत, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली. बऱ्याचदा बँका देखील कालबाह्य झालेल्या लाभार्थ्यांची पासबुके अपडेट करत नाहीत. त्यामुळे मानधनाची रक्कम बँकांकडेच राहते, अशी माहिती मंत्री फळदेसाई यांनी दिली.
डीएसएसएस योजनेचे सुमारे 1.30 लाख लाभार्थी आहेत आणि सरकारने ही संख्या तेवढीच मर्यादित केली आहे. नवीन अर्जांवर विचार करता यावा, यासाठी बोगस किंवा कालबाह्य लाभार्थ्यांना काढून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती फळदेसाई यांनी दिली.
दोन महिन्यांत ‘रो-रो’ सेवा
चोडण ते रायबंदर या जलमार्गावरील रो-रो फेरीबोटीसाठी आणखी दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी माहिती नदीपरिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. राज्य सरकारला येत्या पंधरा दिवसांत 2 रो-रो फेरीबोट उपलब्ध होणार आहेत. गोव्यातील कंत्राटदाराकडून रो-रो फेरीचे बांधकाम केले जात आहे. या फेरीसाठी रॅम्पच्या बांधकामाला विलंब झाला आहे, अशी माहिती मंत्री फळदेसाई यांनी दिली. दरम्यान, चोडण ते रायबंदर या जलमार्गावर रो-रो फेरीसेवा फेब्रुवारीपासून सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.