>> राज्यसभेत माहिती; सद्य:स्थितीत 202 कोटींची 9 कामे सुरू
पणजी स्मार्ट सिटीतील 51 प्रकल्पांसाठी एकूण 1051 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यातील 849 कोटी रुपयांचे 42 प्रकल्प पूर्ण झाले आहेत, तर 202 कोटींच्या 9 प्रकल्पांचे काम सध्या सुरू आहे, अशी माहिती केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री तोखान साहू यांनी राज्यसभेत काल दिली. खासदार सदानंद शेट तानावडे यांनी विचारलेल्या संबंधित प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरातून त्यांनी ही माहिती दिली.
स्मार्ट सिटी योजनअंतर्गत पणजी स्मार्ट सिटी लिमिटेडला केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत 441 कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातील 411 कोटी रुपये खर्च झाले आहेत. ही आकडेवारी 4 मार्च 2025 अखेरीची आहे, असे उत्तरात नमूद केले आहे.
विविध राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या विनंतीनुसार केंद्र सरकारने स्मार्ट सिटी प्रकल्पांची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत वाढविली आहे. पणजी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अंमलबजावणीत विविध विभागांकडून मंजुरी मिळण्यास होणारा विलंब, भूसंपादन, भूजल समस्या, हंगामी पाऊस, संसाधनांच्या उपलब्धता बांधकाम साहित्याची खरेदी अशी आव्हाने होती. यासाठी स्मार्ट सिटी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे, तीन पाळ्यांमध्ये काम करणे, कामे जलद करण्यासाठी विविध पावले उचलावी लागली. केंद्राकडे पणजी स्मार्ट सिटीबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, असेही उत्तरात म्हटले आहे.