>> मंदिर मूळ जागीच बांधण्याची काँग्रेसची मागणी
पर्वरी येथील खाप्रेश्वर राखणदाराचे मंदिर तेथून हलवण्याचा अधिकार कुणालाच नसल्याचे मत काल गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी व्यक्त केले. श्री. पाटकर यांनी काल काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे व इतर पदाधिकाऱ्यांसह पर्वरी येथील श्री देव खाप्रेश्वराच्या मंदिराच्या प्रश्नाबाबत पत्रकार परिषदेत आपल्या भावना व्यक्त केल्या.
खाप्रेश्वर राखणदाराचे मंदिर पर्वरी येथील त्यांच्या मूळ स्थानीच उभारण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. काल पाटकर यांच्यासह माणिकराव ठाकरे व अन्य पदाधिकाऱ्यांनी खाप्रेश्वर राखणदाराच्या मूळ मंदिरस्थळी जाऊन पाहणी केली.
भाविकांना तसेच स्थानिक लोकांना विश्वासात घ्यायला हवे होते. हे मंदिर मोडणे ही कृती अत्यंत चुकीची असल्याचे सांगून भल्या पहाटे देवाची मूर्ती मूळ जागेवरून हटवण्याची कृती ही लोकांच्या धार्मिक भावना दुखावणारी होती, असे पाटकर म्हणाले. सदर मंदिर तेथून न हटवतासुद्धा उड्डाण पुलाचे काम करणे शक्य होते, असे यावेळी बोलताना काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस पक्षाचा विकासाला विरोध नसल्याचे सांगून सरकारने मंदिर हटवण्यापूर्वी भाविकांच्या धार्मिक श्रद्धेचा विचार करायला हवा होता, असे मत त्यांनी यावेळी पुढे बोलताना व्यक्त केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
काँग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे हे तीन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर असून त्यांनी मुरगाव, सांताक्रुझ, कुंभारजुवे व साळगाव या चार मतदारसंघांत बैठका घेत नेते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच गट स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. ठाकरे यांनी राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे व संघर्षाचे कौतुक केले. पक्षातून मोठ्या संख्येने आमदार फुटून गेलेले असताना खचून न जाता या नेते व पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केलेले काम हे कौतुकास्पद असे असल्याचे ठाकरे यांनी म्हटल्याचे सूत्रानी स्पष्ट केले.