सीरियामधील संघर्षात एक हजार नागरिक मृत्युमुखी

0
3

सीरियात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तीव्र संघर्ष सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या संघर्षात दोन दिवसांत तब्बल 1 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सीरियातील हा संघर्ष गेल्या 14 वर्षांच्या संघर्षातील सर्वात घातक ठरला असून हा संघर्ष सीरियन सुरक्षा दल आणि पदच्युत अध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.

नागरिकांना गोळ्या
सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या मते हिंसाचाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. काही लोकांना जवळून गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक ठिकाणी या संघर्षामुळे वीज आणि पाणी खंडित करण्यात आलेले आहे. या संघर्षात आणखी रक्तपात होण्याच्या भीतीने हजारो लोक सुरक्षित ठिकाणी पळून गेले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी बशर अल असद देश सोडून पळून गेल्यानंतर सीरियात नवीन सरकार सत्तेवर आले आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारी दलांनी, बशर अल असदच्या समर्थकांकडून होणाऱ्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला.

यामध्ये सूड उगवणाऱ्याही काही घटना घडल्या. काही सुन्नी बंदूकधाऱ्यांनी असदच्या गटाला पाठिंबा देणाऱ्यांना लक्ष्य केल्याचे सांगितले.
या हिंसाचारात एक हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. यापैकी 745 नागरिकांपैकी बहुतेकांना जवळून गोळ्या घालून ठार करण्यात आले आहे.