अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून जगाला धक्क्यांवर धक्के बसू लागले आहेत. काल ट्रम्प यांनी अमेरिकन काँग्रेसपुढे जे भाषण केले, त्यात कॅनडा, मेक्सिको, चीन, भारत आदी देशांतून आयात होणाऱ्या उत्पादनांना जबर आयात कर लागू करण्याची घोषणा करून टाकली. आपल्या निवडणूक प्रचारातील ‘मेकिंग अमेरिका ग्रेट अगेन’ ह्या घोषणेस अनुसरून अशा प्रकारची आक्रमक पावले ट्रम्प प्रशासन उचलणार ह्याची चाहुल मागेच लागली होती, त्यामुळे आता ती भीती प्रत्यक्षात उतरू लागली आहे. नुकतीच रशियाशी हातमिळवणी करणाऱ्या ट्रम्प यांनी आजवरच्या अमेरिकी विदेश धोरणापासून कोलांटउडी घेऊन युक्रेनला दिली जाणारी सर्व मदत थांबवली. त्या पाठोपाठ आता विविध देशांच्या उत्पादनांवर जबर आयात कर लागू करून आपल्या देशाशी आपल्याला अनुकूल अशा प्रकारचे व्यापारी करार करण्यास त्यांना बाध्य करण्याचे प्रयत्न ट्रम्प यांनी चालवले आहेत. अमेरिकेने कॅनडातून येणाऱ्या उत्पादनांवर पंचवीस टक्के आयात कर लागू करताच कॅनडाचे तरूण पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी आक्रमक प्रत्युत्तर देत अमेरिकेच्या उत्पादनांवरही पंचवीस टक्के प्रत्युत्तरादाखल आयात कर लागू करून टाकला आणि ठोशास ठोसा लगावला. अमेरिकी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात ते म्हणाले की तुमच्या सरकारमुळे तुमच्याकडे महागाई वाढेल, तुमच्या नोकऱ्या जातील. अमेरिकेच्या दबावाला आपण बळी पडणार नसल्याचेच ट्रुडो यांनी सूचित केले. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षांनीही प्रत्युत्तरादाखल अमेरिकी उत्पादनांवर वाढीव आयात कर लागू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ती किती असेल त्याची घोषणा त्यांच्याकडून रविवारी जाहीर कार्यक्रमात होणार आहे. अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवरील आयात कर गेल्या महिन्यातच दहा टक्के केला होता, तो आता दुप्पट म्हणजे वीस टक्के केला गेला. मात्र, चीनने हा घाव निमूट सोसला नाही. त्यांनी अमेरिकेच्या उत्पादनांवरील आयात करातही वाढ करून ठोसा लगावला आहे. तुम्हाला युद्धच हवे असेल तर आम्ही तयार आहोत अशा भाषेत अमेरिकेला प्रत्युत्तर देऊन दोन्ही देशांदरम्यान व्यापारी युद्धाचे सूतोवाच केले आहे. चीन जागतिक व्यापार संघटनेपुढे हा प्रश्न नेणार आहे. अमेरिकेतून आयात होणारे चिकन, गहू, मका, कापूस यांच्यावर पंधरा टक्के आणि दुग्धोत्पादने, सोयाबीन, फळे, भाज्या आदींवर दहा टक्के आयात कर लागू करून चीनने प्रत्युत्तर दिले आहे. भारतही अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीतून सुटलेला नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांचे मैत्रिपूर्ण संबंध, गेल्या महिन्यात मोदींनी आपल्या अमेरिका दौऱ्यात त्यांची घेतलेली भेट ह्या पार्श्वभूमीवर लवकरच उभयदेशांत व्यापारी करार होऊन हा तिढा सुटेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राबवलेल्या आत्मनिर्भर भारत किंवा मेक इन इंडिया मोहिमेचे खरे महत्त्व आता देशाला कळेल. आजकाल कोणत्याही छोट्यामोठ्या उत्पादनासाठी लागणारे सुटे भाग किंवा कच्चा माल अनेक देशांतून आयात करणे भाग पडत असते. आयात आणि निर्यात यांचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करीत असतो, अन्यथा विदेशी चलनाची तूट परवडण्याजोगी राहत नाही. भारतात असंख्य अमेरिकी उत्पादने आजवर आयात होत आली आणि त्यावर भारत सरकारही आयात शुल्क आकारत आले. इतर देश आकारत असलेल्या आयात शुल्काच्या तुलनेत अमेरिकेकडून कमी आयात शुल्क लावले जात होते असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे आणि व्यापार संतुलन राखण्यासाठीच हे आयात शुल्क लागू केले गेले आहेत असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मात्र, ह्याचे दूरगामी परिणाम संपूर्ण जगभरातील बाजारपेठेवर, उत्पादकांवर संभवतात. आयात शुल्कातील वाढ ही शेवटी ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केली जाणार असल्यामुळे महागाई वाढेल. शिवाय परदेशी वस्तूंची मागणी कमी झाल्याने देशी उत्पादनांना चालना मिळेल असे ट्रम्प जरी म्हणत असले, तरी प्रत्येक देश ह्या आयात शुल्कवाढीला प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नसल्याने खुद्द अमेरिकी उत्पादनांवरही आयात शुल्क ते लागू करणार असल्याने तेथील उत्पादन घटेल व लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागतील असे जे भाकीत ट्रुडो यांनी केले आहे ते प्रत्यक्षात उतरू शकते. संपूर्ण जगावर ट्रम्प यांच्या राजवटीत एक अनिश्चिततेचे भीषण सावट येताना दिसते आहे. जगभरातील उत्पादक त्यामुळे विलक्षण धास्तावले आहेत. आयात शुल्कातील वाढीचे भीषण चटके त्यांना बसणार आहेत. ज्या प्रकारे ट्रम्प महाशय सत्तेवर आल्याआल्या धडाकेबाज निर्णय घेत सुटले आहेत, ते पाहता अनिश्चिततेमुळे शेअरबाजार कोसळतो आहे. मात्र, ट्रम्प यांना त्याची फिकीर नाही. लहरी राजाचा हा कारभार जगाला कुठे नेतो पाहूया!