आरोप मडकईकरांनीच सिद्ध करावा : मुख्यमंत्री

0
2

>> फाईल मंजुरीसाठी मंत्र्याच्या पीएला 20 लाखांची लाच दिल्याच्या आरोपाने खळबळ

एक फाईल मंजूर करून घेण्यासाठी एका मंत्र्याच्या पीएला सुमारे 20 लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्षांनी लाच प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. दरम्यान, कोणत्या कामासाठी आणि कोणत्या मंत्र्याला किती पैसे दिले हे फक्त पांडुरंग मडकईकर सांगू शकतात. त्यांनीच आपला आरोप सिद्ध करावा, असे आव्हान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिले.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची मंगळवारी रात्री भेट घेतल्यानंतर माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी एका मंत्र्याला आपली फाईल मंजूर करून घेण्यासाठी 20 लाख रुपये दिल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे सत्ताधारी भाजपमध्ये बरीच खळबळ उडाली आहे.
लाच दिलेल्या संबंधित मंत्र्याचे नाव उघड करावे आणि पोलिसांत तक्रार करावी, असे आव्हान उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी पांडुरंग मडकईकर यांनी दिले आहे. लोकशाहीत एखाद्याने बोलण्याच्या स्वातंत्र्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मडकईकर हे माजी मंत्री आहेत. त्यांच्याबद्दल मला जास्त बोलायचे नाही, सर्वजण त्याला चांगले ओळखतात. इतरांवर भाष्य करण्यापूर्वी त्यांनी स्वतः काय केले आणि त्यांच्या काळात काय घडले ते पाहावे. काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड फेकू नये, असा सबुराचा सल्ला देखील गुदिन्हो यांनी दिला.

भ्रष्ट कारभार पुन्हा उघड : युरी आलेमाव
राज्य सरकारमधील मंत्री आणि सरकारी अधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार वेळोवेळी उघड झालेला आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केली.

स्वेच्छा दखल घेत मडकईकरांची
चौकशी करा : पालेकर

गोवा पोलिसांनी पांडुरंग मडकईकर यांची चौकशी करावी करावी आणि लाच दिलेल्या मंत्र्याचे नाव जाणून घ्यावे व गुन्हा नोंद करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केली. माजी मंत्र्याने भ्रष्टाचाराचा आरोप करणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाली नसली ती स्वेच्छा दखल घेत गुन्हा नोंद करण्याचा अधिकार पोलिसांना आहे, असेही ॲड. पालेकर यांनी सांगितले.

दक्षता खात्याने गुन्हा
नोंदवावा : विजय सरदेसाई

मडकईकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात भ्रष्ट कारभार सुरू आहे. याबाबत आपण वेळोवेळी विधानसभेत बोललो आहे. दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी विभागाने या प्रकरणी गुन्हा नोंद करून पांडुरंग मडकईकर याची चौकशी करावी आणि सत्य जनतेसमोर मांडावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

मडकईकरांचे आरोप गंभीर : बोरकर
माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी केलेला आरोप गंभीर स्वरूपाचा आहे. दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी केली.