एप्रिलपासून नवे शैक्षणिक वर्ष प्रारंभास काही पालकांचा विरोध

0
3

>> शिष्टमंडळाकडून शिक्षण सचिव, संचालकांना निवेदन सादर

राज्यातील काही पालकांनी काल राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांची भेट घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष येत्या एप्रिलपासून सुरू करण्यास विरोध केला.
राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने येत्या एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. राज्यातील विविध भागांतील पालकांच्या शिष्टमंडळाने यासंबंधीचे एक निवेदन शिक्षण सचिव लोलयेकर यांना सादर केले आहे. यावेळी पालकांच्या गटाने शिक्षण सचिव लोलयेकर यांच्याशी राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या विषयावर चर्चा केली असून, एनईपी लागू करण्यास विरोध नसल्याचे स्पष्ट केले. तथापि, एनईपीच्या अंमलबजावणीमध्ये पालकांना विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत व्यक्त केली.

एप्रिल महिन्यात गोव्यात उष्मा वाढलेला असतो. या काळात शाळा सुरू केल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षकांना त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच, उन्हाळी सुट्टीच्या काळात मुले विविध प्रकारच्या प्रशिक्षण वर्गांत सहभाग घेतात. एप्रिल महिन्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू केल्यास मुले उन्हाळी सुट्टीतील प्रशिक्षण वर्गांपासून वंचित राहतील. त्यामुळे एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्यावर फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आलेी, असे सिसिल रॉड्रीगीस यांनी शिक्षण सचिवांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राज्यातील पालकांच्या गटाने शिक्षण संचालक शैलेश झिंगडे आणि इतरांची भेट घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिलपासून सुरू करू नये, अशी विनंती केली आहे. या काळात अनेक भागात पाणी टंचाई, वीज समस्येला तोंड द्यावे लागते. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्यास विरोध नाही; परंतु अंमलबजावणीमध्ये पारदर्शकता हवी. शिक्षण विभागाने किंवा शाळांनी एनईपी 2020 वर चर्चा करण्यासाठी पालकांशी बैठक घेतली नाही. बहुतेक शाळांमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा किंवा इतर मूलभूत सुविधा नाहीत हे पालकांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

विद्यार्थ्यांना कॅनव्हास बूट वापरण्याची सूचना

शिक्षण खात्याने शालेय विद्यार्थ्यांना कॅनव्हास बूट वापरण्याची सूचना केली आहे. यासंबंधीचे परिपत्रक शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी काल जारी केले. राज्य सरकारच्या शिक्षण खात्याने पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शाळेत केवळ कॅनव्हास बूट वापरण्याची सूचना केली आहे. चामड्याचे बूट वापरल्यामुळे पर्यावरणाची हानी होते. तसेच, चामड्याचे बूट तयार करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळे त्वचेची हानी होण्याची शक्यता आहे. कॅनव्हास बूट हे इको-फेंडली असतात. त्यामुळे सरकारी, अनुदानित, विना अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील मुलांनी केवळ पावसाळा वगळून कॅनव्हास बुटांचा वापर करावा, असे परिपत्रकात म्हटले आहे.