>> उद्योगमंत्र्यांची माहिती; महामंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील महिलांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा व उत्तेजन देण्याच्या इराद्याने औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतींतील 30 टक्के छोटे भूखंड महिलांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत तसा ठराव संमत करण्यात आला. उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी काल त्यासंबंधीची माहिती दिली.
बुधवारी असोचॅम, नाबार्ड व केंद्रीय एमएसएमई खात्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाबार्ड, एमएसएमई तसेच राज्याच्या उद्योग खात्याने ग्रामीण भागात जावे व तेथील उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास मदत करावी. एमएसएमई क्षेत्रात महिला उद्योजकांना खूप संधी आहे. एका महिलेला मदत केल्यास ती आपल्या सोबत अन्य मंहिलांना घेऊन पुढे जात असते. म्हणून महिला उद्योजकांना मदत करणे गरजेचे आहे. त्याद्वारे अर्थ व्यवस्थेलाही चालना मिळू शकणार असल्याचे यावेळी गुदिन्हो यांनी सांगितले.
राज्यातील ग्रामीण भागांत राहणाऱ्या महिलांकडे चांगले अन्नपदार्थ तयार करण्याचे कौशल्य आहे. हे अन्नपदार्थ बरेच दिवस टिकणारे असतात. त्यामुळे महिलांच्या या कौशल्याचे रूपांतर व्यवसायात व्हायला हवे, असे गुदिन्हो म्हणाले. एमएसएमईच्या विकासासाठी उद्योग खाते कटिबद्ध असल्याचे गुदिन्हो यांनी यावेळी स्पष्ट केले. गोव्यात बंदर, रेल्वे, दोन विमानतळ व रस्त्यांचे चांगले जाळे आहे. या पायाभूत सुविधांचा फायदा उठवत गोवा हे मोठे व्यापार केंद्र बनवणे शक्य असल्याचे गुदिन्हो यांनी यावेळी नमूद केले. यावेळी डॉ. सागर साळगावकर, मांगिरिष पै रायकर, एम. के. मीना व संदीप धाटकर आदी उपस्थित होते.