राज्यातील सुमारे 130 कोटी रुपयांच्या गुंतवणूक घोटाळ्यातील फरार असलेला मुख्य संशयित आरोपी मायरॉन रॉड्रिग्स याची दुसरी पत्नी दीपाली परब (42, रा. कल्याण, मुंबई) हिला गोवा पोलिसांच्या गुन्हा शाखेने काल अटक केली.
फातोर्डा मडगाव येथे कार्यालय सुरू करून मायरॉन रॉड्रिग्स याने राज्यातील गुंतवणूकदारांना जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करत त्याने विदेशात पलायन केले. या फसवणूक प्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी मायरॉन ची दुसरी पत्नी दीपाली परब हिला नोटीस बजावली होती.
दीपाली परब हिची सखोल चौकशी केल्यानंतर काल तिला अटक करण्यात आली. या फसवणुकीत तिचा सक्रिय सहभाग असल्याचे आणि घोटाळ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
मायरॉन आणि दीपाली या दोघांनी गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. त्यांनी गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले होते. त्याचा त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केला. दीपालीला ईओसी प्रकरणात अटक करण्यात आली असून, बुधवारी मडगाव येथील न्यायालयात हजर केली जाणार आहे, असेही गुप्ता यांनी सांगितले.
दरम्यान, यापूर्वी या प्रकरणामध्ये मायरॉनची पहिली पत्नी सुनीता रॉड्रिग्स हिला अटक करण्यात आली होती. नंतर मडगाव येथील जिल्हा न्यायालयाने तिची जामिनावर सुटका केली होती.