भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांनी राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास काल नकार दिला.
भाजपच्या अखिल भारतीय महिला समन्वय समितीच्या बैठकीच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी बी. एल. संतोष हे गोव्यात आले आहेत. बांदोडा फोंडा येथे श्री महालक्ष्मी देवस्थानच्या आवारात ही बैठक होणार आहे. बी. एल. संतोष यांनी बांदोडा येथे जाऊन एकंदर आयोजनाचा आढावा घेतला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांची उपस्थिती होती.
बी. एल. संतोष गोव्यात येणार असल्याने राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली होती. तथापि, त्यांनी राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाच्या विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलण्याचे टाळले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी संतोष यांची पणजीतील एका हॉटेलमध्ये भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. मात्र राणे यांनी भेटीबाबत पत्रकारांना सविस्तर माहिती देण्याचे टाळले.
संतोष यांची आपण सदिच्छा भेट घेतली. यावेळी कुठल्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही, असे आलेक्स सिक्वेरा यांनी सांगितले.
डिचोलीचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी देखील संतोष यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकास प्रकल्प व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. राज्य मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय चर्चेला आला नाही, असे डॉ. शेट्ये यांनी सांगितले.