>> सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग आणि गोंधळ घातल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांची कारवाई
कांदोळी येथे सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील आमदार अबू आझमी यांचे पुत्र आणि चित्रपट अभिनेत्री आयशा टाकिया यांचे पती अबू फरहान आझमी यांच्यासह त्यांच्या मुलाला काही स्थानिकांनी धक्काबुक्की व मारहाण करण्याची घटना घडल्याने कांदोळीत तणाव निर्माण झाला होता. सार्वजनिक ठिकाणी भांडण, शांतता भंग करणे आणि गोंधळ घातल्या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी अबू फरहान आझमी, शाम नामक अन्य एक व्यक्ती आणि जोझेफ व झिऑन फर्नांडिस या स्थानिक पिता-पुत्रांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
सविस्तर माहितीनुसार, चारचाकीतून जाताना अबू फरहान आझमी यांनी रस्त्याची ‘लेन’ बदलताना ‘इंडिकेटर’ न दाखवल्याच्या रागातून संशयित जोझेफ व झिऑन फर्नांडिस या पिता-पुत्रांनी अबू फरहान आझमी व त्यांच्या मुलाला धक्काबुक्की व मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी बिथरलेल्या अबू फरहान आझमी यांनी आपणाकडे परवाना असलेले पिस्तुल असल्याचे धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्तींना सांगितल्यानंतर वातावरण तंग बनले व जमावाने त्यांना मारहाण केली.
यावेळी तेथे लोकांनी गर्दी केल्याने तेथे जमाव निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, कळंगुट पोलिसांनी घटनास्थळी आल्यानंतर जमावाला पांगवले. ही घटना सोमवारी रात्री 11.20 च्या सुमारास कांदोळी येथील न्यूटन सुपर मार्केटजवळ घडली.
पोलीस स्थानकात आल्यानंतर संशयित पिता-पुत्राने आझमी यांच्याकडे हे प्रकरण आपापसांत मिटवण्याचा प्रयत्न केला. फर्नांडिस आणि आझमी यांनी पोलिसात तक्रार नोंदवण्यास नकार दिला. मात्र, कळंगुट पोलिसांनी थेट तक्रारीच्या आधारे दोन्ही बाजूच्या चौघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
अभिनेत्री आयशा टाकियाची पोस्ट
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अबू फरहान आझमी यांची पत्नी अभिनेत्री आयशा टाकिया हिने सोमवारची रात्र गोव्यात आपल्या पती व मुलासाठी केवढी भयानक व थरकाप उडवणारी ठरली याचे वर्णन सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमधून केले आहे. गुंडांनी आपल्या पती व पुत्राला मारहाण केली, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.