पितृप्रेम

0
3

योगसाधना ः 686, अंतरंगयोग- 272

  • डॉ. सीताकांत घाणेकर

पण एक लक्षात ठेवा गं मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता- मुलावर प्रेम असेलही- पण मुलीवर ‘जीव’ असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जिवापाड जपा. त्यांना तुमच्याकडून फक्त निव्वळ प्रेम हवे असते, आणि त्या प्रेमापुढे जगातले कोणतेही ‘सैराट’ प्रेम हे फिकेच आहे.

आजचे युग ‘इलेक्ट्रॉनिक्स’चे आहे, मोबाईल फोनचे आहे, व्हॉट्सॲपचे आहे. चोवीस तास फोनवर संदेश येतच असतात. सगळे संदेश बघायला वेळही मिळत नाही. प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार काही संदेश वाचतात. थोडे ‘फॉरवर्ड’ करतात, काही सांभाळून ठेवतात. या संदेशांची गुणवत्ता वेगवेगळी. काही अत्यंत बोधदायक व उपयुक्त, काही माहितीपूर्ण तर काही अनावश्यक असतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीप्रमाणे संदेश पाठवते. पुष्कळ वेळ अनेकदा वाया जातो.
जे उपयुक्त संदेश असतात ते मी सांभाळून ठेवतो. काही लिहून काढतो. त्यावर मनन, चिंतन करतो. असाच एक अत्यंत भावनाप्रधान संदेश वाचला तो असा-
शीर्षक छान आहे- ‘मुलगी मोठी होते तेव्हा!’ त्यापुढील एक ओळ अत्यंत महत्त्वाची- ‘बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिट वेळ काढून वाचावा.’

1) ‘न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी ‘आजपासून मी एकटी झोपणार’ म्हणते तेव्हा ती मोठी होते.’

  • खरेच किती सत्य आहे या ओळीत! प्रत्येक आईवडिलांना स्वतःची मुलगी लहान आहे असेच वाटते. पण ती थोडी थोडी मोठी होतच असते. आपण हे टाळू शकत नाही. हल्ली सहसा हे दृश्य बघायला मिळत नाही. कारण मुले थोडी मोठी झाली की अनेकांच्या घरी त्यांची खोली वेगळी असते. ती पालकांच्या खोलीत झोपत नाहीत. पण प्रत्येक पालकाला ही वाक्ये वाचून आपल्या मुलीची आठवण येते. काही मुली विवाहानंतर सासरीसुद्धा गेल्या असतील.

2) ‘शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांडताना दंड पकडून ‘सांभाळून बाबा’ असे म्हणते तेव्हा ती मोठी होते.’

  • ज्यांनी स्वतःच्या मुलीला असे तिच्या शाळेत पोचवून परत शाळा सुटल्यावर घरी आणले असेल त्यांच्या डोळ्यांसमोर हे दृश्य अवश्य येत असणार. आजकाल चित्र बदलले आहे. बहुतेक मुलं शाळेत स्कूटर, गाडी अथवा स्कूलबसने जातात व येतात. पण दुसरे वाक्य बरोबर आहे. रस्ता ओलांडताना मुलगी बाबांच्या दंडाला पकडते व सांभाळून रस्ता ओलांडायला मदत करते. आज असे घडणे अत्यावश्यक झाले आहे, कारण रस्त्यावरील रहदारी भयंकर वाढली आहे आणि तशीच बेशिस्त झाली आहे.
    ज्यांच्या नशिबात असे घडणे शक्य असेल ते खरेच भाग्यवान. कारण मुलगी सदासर्वकाळ वडिलांबरोबर असू शकत नाही.

3) ‘दोन केक आणि आइस्क्रीम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज ‘बाबा एक घास हवा का?’ विचारते तेव्हा ती मोठी होते.’

  • लहान मुलांना अशा वस्तू पुष्कळ आवडतात, त्यामुळे काहीजण मेजावर ठेवलेल्या वस्तू काढून खातात. पण त्यांना आणखी हवे असते तेव्हा ती आपल्या वाटणीचा केक हक्काने घेऊन खातात. काही हरकत नाही. कारण ते बालमन असते.

वय वाढते तशी मुलगी प्रौढ होते, त्यामुळे ती आपल्या पालकांचादेखील विचार करते व बाबांच्या घासाची चिंता करते. असे दृश्य अत्यंत मोहक असते.
4) ‘जरासे लागले की आपण मलम लावताना जोराने रडणारी मुलगी आज ‘बाबा डोकं दुखतंय का? बाम लावू का?’ असे म्हणणारी मुलगी तेव्हा मोठी होते.’

  • जखम झाली की प्रत्येकाला दुखणारच, मग मलम कितीही हळुवारपणे लावले तरी दुख वाटणारच. तेव्हा मुलं रडतात. हे अगदी साहजिक आहे. बाबांनी बालपणच्या आजारपणात मायेने, प्रेमापोटी केलेली सेवा त्यांना आठवते. त्यामुळे बाबा आजारी पडले, त्यांचे डोके दुखायला लागले की मुलगी डोक्याला, कपाळाला बाम लावायला पुढे येते. खरेच असे सुख मिळालेले वडील भाग्यवानच म्हणायला हवेत.

5) ‘चॉकलेटसाठी एक-दोन रुपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज ‘बाबा तुम्हाला पाहिजे तर माझ्या पिगीबँकमधले पैसे घ्या’ म्हणते तेव्हा ती मोठी होते.’

  • लहान असताना प्रत्येकाला चॉकलेट खाणे आवडते, त्यामुळे काही मुले रडतात व स्वतःचा हक्क दाखवतात. त्यात वावगे काहीच नाही. पालकांनी त्यांचे मन समजून घेऊन त्यांची मागणी पुरी केली तर ती गप्प राहतात. त्यामुळे काही मुलांना वाटते की बाबांना केव्हा जरुरी पडली तर स्वतःच्या पिगीबँकमधले पैसे त्यांना द्यावेत. अनेकवेळा ते पैसे पुरे नसतीलदेखील, पण असा विचार व्यक्त करणे ही गोष्ट खरेच कौतुकास्पद आहे.

6) ‘मिकी मावस आणि छोटा भीम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज ‘बाबा, तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का?’ असे विचारते तेव्हा ती मोठी झालेली असते.’

  • लहान मुलांना काही कार्टून फार प्रिय असतात. त्यांना ते कार्यक्रम बघायचे असतात. अनेक कुटुंबांत अशी समस्या येते. वडिलांना बातम्या बघायच्या असतात, तर आईला कुठली तरी मालिका. मुलाला क्रिकेट मॅच बघायची असते तर लहानग्या मुलीला मिकी माऊस व छोटा भीम.
    मुलगी छोटी असल्यामुळे थोडासा बालहट्ट असतोच. त्यामुळे ती रिमोट हातात घट्ट पकडून ठेवते. अशावेळी काही मुली प्रेमाने समजावले तर त्याप्रमाणे रिमोट इतरांना देतातदेखील.

अशी मुलगी मोठी होते तेव्हा ती समजूतदार होते. वडिलांना बातम्या बघायच्या आहेत हे तिला ज्ञात होते तेव्हा ती स्वतः जाऊन वयस्क वडिलांसाठी बातम्या लावते.
काही कुटुंबांत या विषयावर भांडणेही होतात. श्रीमंतांकडे तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी खोली व स्वतंत्र टीव्ही असतो. तिथे असे भावनाप्रधान दृश्य दिसत नाही.
हा सगळा संदेश बोधदायक आहेच, पण संदेश लेखक म्हणतो की शेवटच्या ओळीत सारे सामावले आहे. काय बरे ह्या ओळी असतील? बघूया- ‘पटकन मोठी झालेली ती मुलगी लग्न करून जाताना ‘बाबा रडू नका’ म्हणत स्वतः धाय मोकलून रडते तेव्हा मात्र ती परत लहान होते.’
खरेच, लेखक लिहितात त्यात सत्य आहे.
संदेश अजून संपलेला नाही. पुढे मुलींना उद्देशून एक अत्यंत हृदयद्रावक उपदेश आहे-
‘पण एक लक्षात ठेवा गं मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता- मुलावर प्रेम असेलही- पण मुलीवर ‘जीव’ असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जिवापाड जपा. त्यांना तुमच्याकडून फक्त निव्वळ प्रेम हवे असते, आणि त्या प्रेमापुढे जगातले कोणतेही ‘सैराट’ प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकला. या गोष्टीसाठी का होईना, त्या बापाला तो कधी चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.’
ज्या बापांना मुली आहेत व जे हा लेख वाचतील त्यांच्या डोळ्यांत निश्चितच अश्रू आले असतील. हृदयात प्रेमभाव वाढला असेल.