पाटो-पणजी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणींचा पाठलाग करून त्यांचा विनयभंग प्रकरणात ग्लोन आनंद पेडणेकर (27, रा. टोक-करंजाळे) या संशयित आरोपीला बेळगाव येथे ताब्यात घेण्यात पणजी पोलिसांना यश आले.
गेल्या 23 फेब्रुवारीला रात्रीच्या 10.20 च्या सुमारास हा विनयभंगाचा प्रकार घडला होता. अथक तपासानंतर संशयित ग्लोन पेडणेकर याला 2 मार्चला बेळगाव येथे ताब्यात घेऊन गोव्यात आणण्यात आले. त्याच्याविरोधात पणजी पोलीस स्थानकात एकूण चार गुन्हे नोंद आहेत. त्यातील तीन गुन्हे हे विनयभंगाचे आहेत.
तक्रारदार पीडित तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत दुचाकीवरून पाटो येथील एका सहकारी बँकेच्याजवळील रस्त्यावरून जात असताना एक दुचाकीचालक त्यांच्या समांतर दुचाकी चालवू लागला. त्याने ‘एक्स्क्यूज मी’ असे म्हणत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या तरुणींनी प्रतिसाद न दिल्याने वाहन चालवत असतानाच त्या तरुणाने त्या तरुणींकडे पाहून अश्लील हावभाव सुरू केले. या प्रकारामुळे त्या तरुणींना जबर धक्का बसला. यानंतर पीडित तरुणीने सोशल मीडियावर या घटनेची वाच्यता केली होती. उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी या पोस्टची गंभीर दखल घेऊन त्या पीडित तरुणीशी संपर्क साधल्यानंतर तिने पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या प्रकरणानंतर ग्लोन पेडणेकर हा फरारी झाला होता. पणजी पोलीस त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेत होते. तो बेळगाव येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पणजी पोलिसांच्या एका पथकाने बेळगावात जा ग्लोन याला शिताफीने 2 मार्चला ताब्यात घेतले आणि नंतर पणजीत आणले.
विनयभंग प्रकरणी ग्लोनविरुद्ध यापूर्वी 2 गुन्हे नोंद
ग्लोन पेडणेकर याला 2016 मध्ये चोरी आणि घरात प्रवेश केल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. 2020 मध्ये महिलेचा विनयभंग प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2024 मध्ये महिलांच्या विनयभंग प्रकरणात अटक करण्यात आली होती, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.