97 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात 23 श्रेणींमध्ये ऑस्कर विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यावर्षी दिग्दर्शक शॉन बेकर यांच्या ‘अनोरा’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा ऑस्कर पटकावला. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या श्रेणींमध्ये एकूण 5 पुरस्कार अनोरा चित्रपटाने जिंकले. ‘अनोरा’ हा चित्रप सेक्स वर्करच्या कथेवर आधारित आहे. ‘द ब्रुटालिस्ट’ चित्रपटासाठी ॲड्रियन ब्रॉडीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर आणि ‘अनोरा’ चित्रपटासाठी मिकी मॅडिसनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. .
ऑस्कर पुरस्कार हा जगभरातील चित्रपटांसाठी दिला जाणारा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये काल 97 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला.
शॉन बेकर यांना ‘अनोरा’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला, तसेच सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कारदेखील या चित्रपटाने पटकावला. ‘द ब्रुटालिस्ट’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट मूळ संगीत आणि सर्वोत्कृष्ट छायांकनासाठीही ऑस्कर पुरस्कार जिंकला. या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात ‘अनोराला’ पाच, ‘द ब्रुटालिस्ट’ ला तीन, ‘विकेड’ला दोन, ‘एमिलिया पेरेझ’ला दोन आणि ‘ड्यून : पार्ट टू’ ला दोन पुरस्कार मिळाले आहेत.
या पुरस्कार सोहळ्यात पुन्हा एकदा भारताच्या पदरी निराशा आली.
ब्राझीलच्या ‘आय म स्टिल हिअर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. हा चित्रपट ब्राझीलच्या राजकारणी रूबेन्स पाइवा यांच्या रहस्यमरित्या बेपत्ता होण्याच्या सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटाच्या पुरस्काराची घोषणा होताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत भारताचा हिंदी लघुपट ‘अनुजा’ पराभूत झाला. व्हिक्टोरिया वॉर्मरडॅमच्या ‘आय म नॉट अ रोबोट’ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर जिंकला. ‘अनुजा’ची निर्मिती गुनित मोंगा, प्रियांका चोप्रा जोनास आणि मिंडी कलिंग यांनी केली होती.
ऑस्कर विजेत्यांची नावे
सर्वोत्कृष्ट चित्रपट : अनोरा
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ॲड्रियन ब्रॉडी (द ब्रुटालिस्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : मिकी मॅडिसन (अनोरा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : झोई सल्डाना (एमिलिया पेरेझ)
सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : किरन कल्किन (अ रिअल पेन)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : शॉन बेकर (अनोरा)
सर्वोत्कृष्ट चित्रपट संकलन : अनोरा
सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट : आय एम स्टिल हिअर – ब्राझील
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड फिचर फिल्म : फ्लो
सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा : अनोरा (शॉन बेकर)
सर्वोत्कृष्ट रूपांतरित पटकथा : कॉन्क्लेव्ह (पीटर स्ट्रॉघन)
सर्वोत्कृष्ट गीत : एल माल (एमिलिया पेरेझ)
सर्वोत्तम ओरिजनल स्कोअर : द ब्रुटालिस्ट
सर्वोत्कृष्ट छायांकन : द ब्रुटालिस्ट
सर्वोत्कृष्ट माहितीपट : नो अदर लँड
सर्वोत्तम वेशभूषा डिझाइन : विकेड
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : विक्ड
सर्वोत्कृष्ट ध्वनिसंकलन : ड्यून- पार्ट टू
सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स : ड्यून- पार्ट टू
सर्वोत्कृष्ट लाईव्ह ॲक्शन लघुपट : आय ॲम नॉट अ रोबोट
सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड लघुपट : इन द शॅडो ऑफ द सायप्रस
सर्वोत्कृष्ट माहितीपट शॉर्ट फिल्म : द ओनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा