सहा तालुक्यांत होती शिवरायांची राजवट

0
3

प्रा. प्रजल साखरदांडे यांचे प्रतिपादन

पेडणे, डिचोली, सत्तरी, सांगे, केपे व काणकोण या सहा तालुक्यांत 1664 पासून पुढील काही वर्षे छत्रपती शिवाजी महाराजांची राजवट होती आणि त्याचे पुरावे नामवंत इतिहासकार डॉ. पांडुरंग पिसुर्लेकर यांच्या पुस्तकांत तसेच गोवा गॅझेटिअरमध्ये उपलब्ध असल्याचे इतिहासाचे अध्यापक प्रा. प्रजल साखरदांडे यांनी म्हटले आहे. इतिहासाचे अन्य एक अभ्यासक सचिन मदगे यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांची गोव्यात राजवट होती व तशी माहिती इतिहासकार डॉ. पिसुर्लेकर यांच्या पोर्तुगीज-मराठे संबंध या पुस्तकात असल्याचे म्हटले होते.

या संबंधी प्रा. साखरदांडे यांनी, पोर्तुगीज कागदपत्रांमध्येही तसा उल्लेख आहे. डॉ. पिसुर्लेकर यांच्या पोर्तुगीज-मराठे संबंध या पुस्तकात 50 ते 86 या पानांवर त्यासंबंधीची माहिती उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 साली पेडणे, डिचोली, साखळी, सत्तरी हे प्रदेश आदिलशहाकडून ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे.

19 नोव्हेंबर 1667 या दिवशी महाराजांनी कोलवाळचा किल्ला ताब्यात घेतला. 6 डिसेंबर 1667 रोजी त्यांनी नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराला भेट देत 13 नोव्हेंबर 1668 या दिवशी मंदिराचा जीर्णोद्धार केला. 1675 साली त्यांनी फोंडा, सांगे, केपे व काणकोण हे तालुके ताब्यात घेतले. 1679 साली त्यांनी बाळ्ळीच्या हवालदाराला बेतूल किल्ला बांधण्याचे आदेश दिले. ही सर्व माहिती पुस्तकात उपलब्ध असल्याचे प्रा. साखरदांडे यांनी म्हटले आहे.