बजरंग दलाच्या ‘त्या’ कार्यकर्त्यांवर त्वरित कारवाईची मागणी

0
3

घोगळ – मडगाव येथे जाहीर निषेध सभा

तीन दिवसांमागे माजी आमदार व ज्येष्ठ साहित्यिक उदय भेब्रे यांच्या निवासस्थानाबाहेर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तसेच त्यांच्याविषयी काढलेल्या अपशब्दांविरोधात काल मडगावात झालेल्या सभेत बजरंग दलाच्या सदर कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी करणारा ठराव एकमताने संमत केला. काल रविवारी घोगळ येथील सेंट सेबास्यांव कपेल मैदानावर ही सभा आयोजित केली होती. यावेळी दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस, आमदार कार्लुस आल्वारीस, आमदार क्रुझ डिसिल्वा, अरविंद भाटीकर, दामोदर मावजो, फा. मोवझिनियो आताइद यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बजरंग दलाचा निषेध करताना सदर कार्यकर्ते दहशत निर्माण करत राज्यातील एकता नष्ट करीत असल्याचा आरोप केला.

गोवा सरकारने या घटनेसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी व संबंधितांवर कारवाई करावी, उदय भेंब्रे यांना पोलीस संरक्षण द्यावे. गोवा सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे ठराव मंजूर केले. या सभेत कोकणी भाषा मंडळाच्या अध्यक्ष रत्नमाला दिवकर यांनी उदय भेब्रे यांच्या निवासस्थानी झालेली घटना विषद केली. भारत लोकशाहीने चालणारा देश आहे. संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्यांचे रक्षण करणे हे प्रत्येकाचें कर्तव्य आहे. विचार स्वातंत्र्याला लोकशाही मार्गाने उत्तर न देता दहशत निर्माण करू पाहत असल्याच्या वृत्तीचा निषेध करत असून अशा आक्रमणे करण्याचा यापुढे प्रयत्न झाल्यास आम्हीही आक्रमक बनू असा इशारा फा. आताइद यांनी दिला.

मावजो यांनी लोकशाहीने नागरिकाना न्याय, व्यक्ती स्वातंत्र्य असे मूलभूत हक्क दिले आहेत. मात्र या अशा घटनांमुळे गोव्यात कायदा व सुव्यवस्था नष्ट झाल्याचे सांगितले. प्रशांत नाईक यांनी आम्ही शिवाजी महाराज वाचलेले आहेत मात्र त्यांनी दहशत शिकवलेली नाही असे सांगितले. सूत्रसंचालन अनंत अग्नी यांनी केले.