मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शिवजयंतीच्या भाषणात, संपूर्ण गोव्यावर 451 वर्षे पोर्तुगिजांचे राज्य नव्हते हे सांगण्याच्या ओघात गोव्याच्या उर्वरित भागात शिवशाही होती असे बोलून गेल्याने काही गावगन्ना विचारवंत ‘छत्रपती शिवाजी महाराज हे पोर्तुगिजांचे मित्र होते आणि त्यांनी पोर्तुगिजांना घालविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही’ असा सिद्धान्त मांडण्यासाठी नेटाने पुढे सरसावले. ‘महाराज होते म्हणून गोव्यात पोर्तुगिजांना धाक बसला आणि धर्मांतरे झाली नाहीत’ असे सावंत म्हणाले, त्यालाही आक्षेप घेताना ‘शिवाजी महाराजांनी बार्देशवर स्वारी केली तेव्हा बायकामुले उचलून नेली आणि काय चाललेय हे बघायला चर्चबाहेर आलेल्या तीन पाद्य्रांना ठार मारले’ असे म्हणण्यापर्यंत ह्यांची मजल गेली आहे. त्यामुळे हा बुद्धिभेद रोखण्यासाठी वस्तुस्थिती काय आहे हे शोधण्याची जरूरी निर्माण झाली आहे. इसवी सन 1324 मध्ये खिलजीच्या स्वारीत यादवांचे राज्य नष्ट झाल्यानंतर ज्या भूमीमध्ये तीनशे वर्षे केवळ अंधःकार होता, तेथे स्वराज्याची ज्योत ज्याने कोवळ्या वयात प्रज्वलित केली, पाच पातशाह्यांशी जो निकराने लढला, मोगलांसारख्या बलाढ्य शक्तीशी तहहयात झुंज देऊन त्यांना दक्षिणेत येण्यापासून रोखले, असा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दूरदर्शी राज्यकर्ता पोर्तुगिजांसारख्या परकीय सत्तेला मित्र मानून व्यवहार करील असे सूचित करणेच मुळात मूर्खपणाचे आहे. परराष्ट्रनीतीचा भाग म्हणून काही औपचारिक पत्रव्यवहार चालतो, परंतु त्याचा अर्थ पोर्तुगीज हे आपले शत्रू आहेत हे न कळण्याइतके शिवाजी महाराज अजाण निश्चितच नव्हते. दोन्ही सत्तांना परस्परांपासून असलेल्या धोक्याची पूर्ण जाणीव होती. दोहोंतील चकमकी आणि तहनामे ह्या संघर्षाचे साक्षी आहेत. लुई लैतांव द व्हिएगश या पोर्तुगीज कारागिराच्या मदतीने शिवाजी महाराजांनी आरमार उभारले, शिवलंका सिंधुदुर्ग उभा केला तोच मुळी डच, पोर्तुगीज यासारख्या परकीय सत्तांना जरब बसवण्यासाठी. परंतु हे सत्य हे आपल्याकडचे वायंगणे विचारवंत सांगत नाहीत. ह्या लुई लैतांवला जर शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून पोर्तुगिजांनी पाठवले असते, तर तो बांधत असलेल्या युद्धनौकांपासून आपल्याला धोका आहे हे पाहून त्याला ती नोकरी सोडावी यासाठी त्यांनी का प्रयत्न केले असते? शून्यातून विश्व साकारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांपाशी पोर्तुगीज हे आपले शत्रू आहेत हे समजण्याएवढी दूरदृष्टी नव्हती हे सूचित करण्यासाठी त्यांनी ‘पोर्तुगिजांना हाकलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही’ असा धडधडीत खोटा दावा करणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. महाराजांनी दमण आणि चौल ताब्यात घेतले तेव्हापासून पोर्तुगिजांना शिवाजी महाराजांचा धाक होता. जो मैत्रीचा आव पोर्तुगीज पत्रव्यवहारातून आणत होते तो शिवाजी महाराज बलाढ्य असल्याने त्यांच्याशी सबुरीचे धोरण हवे ह्या भूमिकेतून. 1666 मध्ये फोंड्याच्या कोटावर महाराजांनी हल्ला चढवला तेव्हा विजापूरकरांना पोर्तुगिजांनी गुप्त मदत केली होती. जंजिऱ्याच्या मोहिमेतही सिद्दीला पोर्तुगिजांची अंतःस्थ मदत होती. शिवाजी महाराज हे सगळे न कळण्याइतके असमंजस होते काय? बार्देशवरील स्वारीसंदर्भात 30 नोव्हेंबर 1667 चे गोव्यातील एका इंग्रजाने कारवारच्या वखारीला पाठवलेले पत्र उपलब्ध आहे, त्यात पोर्तुगीज प्रदेशात लपलेल्या देसायांच्या नायनाटाबरोबरच हिंदूंच्या छळाबद्दल वाईट वाटल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी बार्देशवर स्वारी केली हे नमूद केलेले आहे. त्या स्वारीनंतर व्हाईसरॉयने हिंदूंवरील निर्बंध मागे घेतले हेही बोलके आहे. परंतु हे सत्य पचनी न पडल्याने मार्कुस द पोंबालमुळे धर्मांतरे थांबल्याचे तर्कटही मांडले गेले आहे. परंतु मार्कुस द पोंबालचा जन्मच शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरचा अठराव्या शतकातला आहे ह्याचे भानही ह्यांना राहिलेले दिसत नाही. 1672 मध्ये पेडणे, सत्तरी आणि डिचोली शिवाजी महाराजांच्या ताब्यात होता. डिचोली ताब्यात आल्यानंतर त्यांनी सप्तकोटीश्वराचा जिर्णोद्धार केला. 1675 साली फोंडा जिंकून घेतल्यानंतर फोंडा, केपे आणि बाळ्ळी महाराजांच्या ताब्यात आले. फोंड्यात त्यांनी सुभेदार नेमला होता आणि बाळ्ळीत हवालदार नियुक्त केला होता ज्याच्याकरवी महाराजांनी खोलगडचा किल्ला बांधला आणि गंगावळीस स्वराज्याच्या सीमा भिडवल्या. आता छत्रपती गोवा जिंकून घेतील ह्या भीतीने पोर्तुगिजांनी कुंकळ्ळीत हजारो सैनिक नेऊन ठेवले होते, परंतु महाराजांच्या निधनामुळे ते तडीस गेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजीराजांनी तर जवळजवळ गोव्याच्या राजधानीलाच धडक दिली होती. ह्या थोर पितापुत्रांचा हा सारा जाज्वल्य इतिहास लपवण्याची एवढी अतोनात धडपड विशिष्ट घटकांकडून नेमकी का चालली असावी बरे?