गोवा राज्य शालांत मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शनिवार दि. 1 मार्चपासून सुरू होत आहे. यंदा 18871 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. एकूण 32 केंद्रातून ही परीक्षा होणार असून, ती 21 मार्चपर्यंत चालणार आहे. शनिवार पहिल्या दिवशी पहिली भाषा विषय म्हणजेच इंग्रजी, मराठी, उर्दूची परीक्षा होणार आहे. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळाने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून अपात्र ठरवण्यात येणार असल्याचा इशारा शालांत मंडळाने दिला आहे. जास्त खिसे असलेले कपडे घालून परीक्षेला येऊ नये, अशी सूचनाही परीक्षार्थींना करण्यात आली आहे. तसेच कसलेही स्टिकर्स नसलेली पारदर्शक अशीच पाण्याची बाटली आणण्याची अटही त्यांना घालण्यात आली आहे. लिहिण्यासाठीचे पॅडही पारदर्शक असावे, असे कळवण्यात आले आहे.