यंदापासून सर्व शाळांमध्ये ‘विज्ञान सेतू’ उपक्रम

0
2

>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; विज्ञानाविषयी आवड व जिज्ञासा निर्मितीचे प्रयत्न

राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड व जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी शिक्षण खाते प्रयत्नरत असून, त्यासाठीच येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘विज्ञान सेतू’ हा महत्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार असल्याचे शिक्षणमंत्री या नात्याने बोलताना काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
सावंत हे काल विज्ञान दिनानिमित्त मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर व अन्य अधिकारी उपस्थित होते. भविष्यातील वैज्ञानिक घडवण्याचे काम हे शिक्षक व पालक यांना करावे लागणार आहे. मुलांना काय आवडते आणि कशात ती पारंगत आहेत हे जाणून घेऊन त्यांना योग्य दिशा दाखवणे हे काम पालक व शिक्षकांना मन लावून करावे लागणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाविषयी आवड व जागृती निर्माण व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज आहे. विज्ञान चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणारे गोवा हे एकमेव राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीहीगोव्याची प्रशंसा केली असल्याचे ते म्हणाले. केवळ पदवी मिळवण्याच्या शिक्षणावर भर न देता मुले जीवनात कशी यशस्वी होतील याचा विचार नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण तयार करताना झाला असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.