शिवोली येथील एका वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्टचा धाक दाखवून तिची एक कोटी रुपयांच्या फसवणूक केल्या प्रकरणात गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विभागाने आणखी दोन जणांना अटक केली असून, या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे.
सायबर गुन्हा विभागाला या फसवणूक प्रकरणाचा तपास करताना या प्रकरणामध्ये राकेश लक्ष्मण पाटील (39, रा. चिकाळे-पनवेल) आणि सचिन राजाराम पाटील (38, रा. चिकाळे-पनवेल) या दोघांचा सहभाग असल्याचे आढळून आले. सायबर गुन्हा विभागाचे उपनिरीक्षक सर्वेश सावंत याच्या नेतृत्वाखालील पथकाने चिकाळे पनवेल रायगड येथून त्या दोघांना अटक करण्यात यश मिळविले.
या फसवणूक प्रकरणातील एक सहआरोपी राहुल मिश्रा याच्याशी या दोघांचा संबंध आहे. या प्रकरणामध्ये आत्तापर्यंत 8 मोबाईल फोन, एक लॅपटॉप, दोन हार्ड डिस्क ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच, 40 लाख रुपये गोठविण्यात आले आहेत. दोघेही संशयित आरोपी सध्या सायबर गुन्हा विभागाच्या पोलीस कोठडीत आहेत. ऑनलाईन पद्धतीने मिळविलेले रक्कम हस्तांतरित करण्यासाठी हे दोघे खाती उपलब्ध करून देत होते, असे पोलीस तपासात आढळून आले आहे.