अवघ्या देशाचे लक्ष ज्या घटनेने वेधून घेतले होते, त्या महाकुंभाची महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी रीतसर सांगता झाली. 13 जानेवारीपासून सुरू झालेल्या आणि 45 दिवस चाललेल्या ह्या अमृतपर्वणीमध्ये अखेरच्या दिवसापर्यंत 66 कोटी 30 लाख लोकांनी सहभाग घेतला अशी आकडेवारी आता उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केली आहे. 66 कोटी लोक ह्याचा अर्थ भारत आणि चीनखालोखाल जगातील तिसऱ्या सर्वाधिक लोकसंख्येच्या देशाची ती जनता ठरावी! एवढ्या प्रचंड, भव्यदिव्य प्रमाणामध्ये अशा सोहळ्याचे आयोजन करणे ही अर्थातच केवढी मोठी जबाबदारी असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो, परंतु उत्तर प्रदेश सरकारने काही अपवादात्मक घटना सोडल्यास उत्तम प्रकारे ही जबाबदारी पेलली असे आता म्हणावेच लागेल. महाकुंभादरम्यान 29 जानेवारीला मौनी अमवास्येच्या पहाटे झालेली चेंगराचेंगरीची घटना टळली असती, तर ह्या सोहळ्याला जे गालबोट लागले ते लागले नसते. त्या तसेच दिल्ली रेल्वेस्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटना ह्या महासोहळ्याला अकारण काळा डाग लावून गेल्या. महाकुंभादरम्यान एक दोनदा तंबूंना आगी लागण्याचाही प्रकार घडला. त्यामुळे उत्तर प्रदेश सरकार जाहिरातबाजी करीत असलेला ‘सुरक्षित कुंभ’ खरोखर सुरक्षित आहे का हा प्रश्न विचारला जाणे स्वाभाविक होते. शिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणावरील हिंदूंच्या ह्या महाउत्सवाला गालबोट लावण्यासाठी घातपाती दहशतवादी कारवाया होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर फार मोठा भर देण्यात आला होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने त्याबाबत चोख कामगिरी बजावली गेली. महाकुंभ आयोजनापुढील सर्वांत मोठे आव्हान होते ते यात्रेकरूंची व्यवस्था करण्याचे. विशेषतः त्यांच्या स्नानासाठीची योग्य व्यवस्था, निवास, न्याहरी, आहार, मलमूत्र, कचरा ह्या सगळ्याची योग्य व्यवस्था करणे तेही कोट्यवधी यात्रेकरू येणार असताना हा केवढा मोठा व्याप असेल ह्याची नुसती कल्पनाही करवत नाही. परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने केंद्र सरकारच्या मदतीने हेही शिवधनुष्य पेलले. गंगा, यमुना, सरस्वतीच्या काठावर खास बारा किलोमीटरचा घाट बांधला गेला. त्याच्या बाजूने दोन लाखांहून अधिक सुसज्ज तंबूंची व्यवस्था करण्यात आली. मग तेथे पिण्याच्या पाण्यापासून मलमूत्रविसर्जनापर्यंतच्या साऱ्या सुविधा पुरवण्यात आल्या. स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्यात आले. कोठेही अस्वच्छता, कचरा दिसला तर त्याची छायाचित्रे टिपण्यासाठी जगभरातून आलेले छायाचित्रकार टपलेलेच होते, परंतु त्यांनाही शेवटी भुरळ घातली ती लाखोंच्या गर्दीच्या नयनरम्य दृश्यांनी. त्यामुळे नेहमी उकिरडाच शोधणारे काही देशी परदेशी पत्रकारही प्रयागराजमध्ये उकिरडे फुंकायला गेले नाहीत. त्यांनाही महाकुंभाच्या त्या भारावून टाकणाऱ्या दृश्यांनी भुरळ घातली. अर्थात, एवढ्या मोठ्या प्रमाणावर भाविकांना स्नान करताना पाहून पाण्यात किती सूक्ष्मजंतू असतील ह्याचा हिशेब मांडणारेही होतेच. परंतु तब्बल 144 वर्षांनी होणाऱ्या ह्या सोहळ्यात सहभागी होण्याचे समाधान मोठे मानणाऱ्या भाविकांनी त्याचीही तमा केली नाही. भाविकांची ही महाकुंभाला हजेरी लावण्याची आस पाहून राजकारण्यांना मतांचे राजकारण सुचले नसते तरच नवल. मग विविध राज्य सरकारांतील सत्ताधारी पक्षांनी आपल्या पक्षाच्या मतदारांना महाकुंभाच्या सफरी घडवण्यासाठी खास रेल्वेगाड्यांची सोय केली. गोवाही याला अपवाद ठरला नाही. तीन रेलगाड्या भरून सत्ताधाऱ्यांनी आपल्या बगलबच्च्यांना महाकुंभाची यात्रा घडवली. महाकुंभाची यात्रा करणाऱ्यांपैकी कितीजण निःस्सीम श्रद्धेने गेले, कितीजण सहलीसाठी गेले, कितीजण ह्या महत्त्वपूर्ण सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत हे जगाला दाखवण्यासाठी गेले हा वेगळा प्रश्न, परंतु जे खरोखर श्रद्धेने गेले, त्यांना तेथे गंगा, यमुना, सरस्वतीच्या पावन तीर्थावर स्नान करून कृतकृत्य निश्चित वाटले असेल. 144 वर्षांनी होणारा हा सोहळा. म्हणजेच मानवी आयुष्यात तो केवळ एकदाच येऊ शकतो. त्यामुळे त्याचे असाधारणत्व लक्षात घेऊन लाखो श्रद्धायुक्त अंतःकरणे प्रयागराजला धावली. त्रिवेणी संगमावर स्नान करून कृतकृत्य झाली. ह्या स्नानाने केवळ शरीरेच स्वच्छ झाली असे नाही, तर मने स्वच्छ झाली असेच म्हणायला हवे, कारण जात, पात, भाषा, प्रदेश हे सगळे भेद सारून अखिल हिंदू समाज एकत्र येण्याचा हा अनोखा सोहळा होता. तेच त्याचे खरे वैशिष्ट्य होते. भेदाभेद दूर सारून एकत्र येऊन एका उदात्त ध्येयप्राप्तीसाठी सचैल स्नानाने जे पुण्य पदरात पडेल ते पडेलच, परंतु हा जो दिव्य अनुभव गाठीस बांधला गेला असेल, तो तरी आयुष्यभर पुरेल.