आपलं आरोग्य आपल्या हातात

0
4
  • डॉ. मनाली महेश पवार

आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. त्यासाठी आरोग्य म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आरोग्य म्हणजे नुसतं रोगविरहित असणे नव्हे तर शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिकरीत्या निरोगी असणे म्हणजे आरोग्य.

आज जगण्याची वयोमर्यादा वाढली आहे, पण निरोगी जगण्याचं आयुष्य मात्र कमी झालं आहे. जगतो अगदी सत्तर-ऐंशी वर्षे, पण गोळ्या-औषधे खात, पथ्यापथ्य सांभाळतच ना? आज साध्य-असाध्य असे अनेक आजार मनुष्याचे आरोग्य बिघडवत आहेत आणि त्याला वयाची कुठलीही अट नाही. म्हातारपण आलं की आरोग्याच्या तक्रारी, कुरबुरी असणारच असं म्हणायला आता कुठे वावच नाही. हाडांचे त्रास, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयाचे विकार, कर्करोग यांसारखे भयानक रोगदेखील आता बालवयापासून, तरुणवयातदेखील उद्भवतात. मग या आजारांपासून सुटका करून घेण्यासाठी नवनवीन औषधोपचार, व्हॅक्सिनं, तंत्रज्ञानांचा शोध लावायचा, की रोग होऊच नये म्हणून आपल्या आयुर्वेदशास्त्राचा अवलंब करायचा? आचरण करायचे?
आपले आरोग्य आपल्याच हातात आहे. त्यासाठी आरोग्य म्हणजे नक्की काय हे जाणून घेणे जास्त गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते आरोग्य म्हणजे नुसतं रोगविरहित असणे नव्हे तर शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिकरीत्या निरोगी असणे म्हणजे आरोग्य. आयुर्वेदशास्त्रातदेखील हेच सांगितले आहे.

समदोषः समाग्निश्च समधातु मलक्रियः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः स्वस्थः इत्यभिधीयते॥

  • आपल्या शरीरातील वातादी दोष, आपली पचनशक्ती (अग्नी), रसादी धातू, मूत्रादी मल हे समस्थितीत म्हणजे यांच्या क्रिया योग्य हव्यात. इंद्रिये, मन, आत्मा प्रसन्न हवा तरच आपल्याला आरोग्य लाभते.
  • शारीरिक आरोग्य म्हणजे चांगली योग्य वेळेवर भूक लागणे. जेवायला बसल्यावर पोटातला अग्नी वाढून अजून अजून खावेसे वाटणे. योग्य वेळेवर तहान लागणे. रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या शांत झोप लागणे. तसेच सकाळी योग्य वेळेवर अलार्म न लावता जाग येणे. दिवस खूप आनंदात जाणे म्हणजे आरोग्य.
  • मानसिक आरोग्य म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपल्या मनावर आपला ताबा राहणे. गोंधळून न जाता योग्य निर्णय घेणे.
  • सामाजिक आरोग्य म्हणजे पूर्ण कुटुंब आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या जनसमुदायाबरोबर गुण्यागोविंदाने वागणे, न भांडता राहणे. काही समस्या असल्यास त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे. थोडक्यात हिंसा टाळणे, स्वच्छता राखणे, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करणे, जेणेकरून जनपोध्वंस आजार निर्माण होणार नाहीत व त्यातून जनसमुदाय निरोगी राहील.
  • आध्यात्मिक आरोग्य आजारपणासोबत येणाऱ्या वेदना आणि अडचणींना तोंड देण्यास मदत करते.
    मग हे आरोग्य टिकवायचे कसे?
    अग्नी उत्तम असेल म्हणजे पचनक्रिया सुस्थितीत असेल आणि त्याला समतोल आहार पुरविला गेला तर शरीरघटकांना उत्तम पुरवठा मिळतो व त्यामुळे आयुष्य, शरीरवर्ण, बल, उत्साह, पुष्टी यांनी शरीर संपन्न होते, म्हणजेच थोडक्यात आरोग्य टिकले जाते. म्हणजे अर्थातच शारीरिक आरोग्य आपल्या सुयोग्य आहारावर अवलंबून असते. आयुर्वेदाच्या संकल्पनेनुसार आपण जे अन्न ग्रहण करतो त्यातूनच आपल्या तिन्ही प्रकृतीची- शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक- जडणघडण होत असते. म्हणून आपण जे अन्न ग्रहण करतो ते समतोल आणि परिपूर्ण असायला हवे. खाणे हे चावून, चोखून, चघळून, पिऊन सगळ्या क्रिया करणारे हवे.
  • आयुर्वेदशास्त्रात गोड, तिखट, कडू, आंबट, तुरट, खारट अशा सहा रसांचे वर्णन केलेले आहे. आपल्या रोजच्या आहारात या सहाही रसांचा समावेश असायला हवा. उदा. परिपूर्ण आहारामध्ये भात, वरण, चपाती, भाज्या, सॅलाड आणि ताक यांचा समावेश असावा. आहारातील घटक हे नेहमी प्रोटिन, कार्बोदक, व्हिटामिन, कॅल्शियम इत्यादीच असू नयेत, तर आपण सेवन केलेला आहार हा किती पचण्यास योग्य आहे तेही पाहावे. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी जेवण गरम जेवावे. ते पचनासाठी लाभदायक असते.
  • साधारणतः जेवणामध्ये चटणी असावी. ओली किंवा सुकी वा लोणचे असावे. हे घरी बनवलेले अतिरिक्त तेल, मीठ न वापरता असावे. यामुळे जेवताना तोंडातील पाचक रसांचा स्राव वाढतो आणि शरीरातून घातक द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते. ती एखाद चमचाच घ्यावी.
  • वाफ दिलेल्या भाज्या, फळांचे साधे फोडणी किंवा दह्यातले सॅलाड जेवणात असावे. दह्यातले सॅलाड घेताना त्यात काळ्या मिरीची थोडी पूड टाकावी.
  • भाज्यांचे किंवा डाळीचे सूप घ्यावे. याने तोंडातील आणि जठरातील पाचक रसांचे प्रमाण वाढते.
  • भाज्या व कडधान्ये यातून जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रथिने मिळतात.
  • भात, खिचडी, चपाती, पराठे हा जेवणाचा मुख्य घटक असतो, त्यातून सर्वाधिक ऊर्जा मिळते.
  • वरण, आमटीसाठी वापरलेल्या मूग, तूर, चणे, हरबरे इत्यादी डाळी यांत भरपूर प्रथिने असतात. त्यामुळे याचा आहारात भाताएवढाच समावेश करावा म्हणजे पचन सुलभ होते.
  • गोड पदार्थांचाही जेवणात समावेश करावा. त्याने शर्करेची परिपूर्णता होते व मनाला आनंद मिळतो.
  • ताक जेवणानंतर प्यावे. त्याने पचन सुलभ होते.
    सहाही रसांचे सेवन बल वाढवण्यासाठी व स्वास्थ्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे. केवळ एक-दोन रसांचे सेवन केल्यास मनुष्याला दुर्बलता येते व त्यातून विविध रोगही उद्भवू शकतात.

आहारात वातादी दोषांचा समतोल राखून रसादी धातूंचे पोषण नक्की होईल; पण इंद्रियांचे आरोग्य, इंद्रिये प्रसन्न होण्याकरिता, त्यांची कार्यक्षमता वाढविण्याकरिता त्यांच्या अधिष्ठानाची काळजीही घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे.

  • घ्राणेंद्रियांची काळजी नाकातून नस्य देण्याने होते.
  • श्रोतेंद्रियाची काळजी कानांमध्ये तेल- कर्णपूरण- केल्याने होते.
  • चक्षुनेंद्रियाची काळजी डोळ्यांत अंजन टाकल्याने होते.
  • स्पर्शनेंद्रियाची काळजी अभ्यंग केल्याने होते.
  • रसनेंद्रियाची काळजी तोंडात कवल- गण्डूष केल्याने होते.

रज-तम दोषांंमुळे ईर्ष्या, द्वेष, मत्सर, चिंता, भय, मोह इत्यादी विकारांचे प्राबल्य वाढते व यातूनच मानसिक आजार निर्माण होतात. म्हणून मानसिक आरोग्य मिळवण्यासाठी सद्वृत्तीचे आचरण किंवा आचार-रसायन यांचा अवलंब करणे आवश्यक आहे. सद्वृत्त पालन म्हणजे वडीलधाऱ्यांनी घालून दिलेले काही नियम. समाजात वावरताना सामान्यतः आचारावयाचे शिष्टाचाराचे नियम म्हणजे धर्माने वागून अर्थार्जन, कामपूर्ती करता करता आत्मकल्याण साधणे.
सर्व प्राणिमात्रांचे प्रयत्न हे सुखाच्या प्राप्तीसाठीच चालले आहेत. हे सुख धर्माचरणावाचून मिळत नाही. म्हणून प्रत्येकाने धर्माचरणाने वागावे व दुर्जनांपासून दूर राहावे. उत्तम आरोग्य टिकण्यासाठी सकस, आपल्या प्रकृतीनुसार, ऋतूनुसार, वयोमानानुसार, देशानुसार आहाराचे सेवन हवे.

  • खाल्लेले अन्न पचल्यावरच दुसरे अन्न खावे.
  • भूक लागल्यावरच जेवावे- खावे. सारखे चरत बसू नये किंवा भूक नसताना वेळ झाली म्हणून खाऊ नये.
  • मनाला प्रिय असणारे अन्नपदार्थ खावेत.
  • खाद्यपदार्थ अगदी पोट भरेपर्यंतही खाऊ नयेत व अगदी कमीही खाऊ नयेत. अर्धा भाग खाद्यपदार्थांनी, पाव भाग पाणी किंवा पेय पदार्थांनी व पाव भाग रिकामा ठेवावा.
  • नेहमी घरचे ताजे अन्न खावे. फ्रीजमधील अन्न खाऊ नये. पॅकेटबंद अन्नपदार्थ खाऊ नयेत. फास्ट फूड, जंक फूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे, साखरेचे सेवन टाळावे. अतिरिक्त मिठाच्या पदार्थांना बंदी घालावी व याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या घरापासून करावी. सद्यस्थितीत नवरा-बायको दोघंही मेहनत करतात. दिवस-रात्र काम करतात. भरपूर पैसा कमावतात व हा पैसा हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये खर्च करतात व पुढे जाऊन उरलेला पैसा आरोग्य कमावण्यासाठी डॉक्टरांना देतात.
  • आपल्या शरीराला गरजेपुरता तरी रोज व्यायाम करावा. मग ते चालणे असो वा पळणे वा सूर्यनमस्कार वा नुकताच वॉमअप. दर दोन तासांनी आपल्या शरीराची जरा तरी हालचाल व्हावी याची काळजी घ्यावी.
  • खरे बोलावे, चोरी करू नये, वडीलधाऱ्यांचा मान राखावा. त्यांचा अपमान करू नये. स्वतःमध्ये शिस्त बाळगावी. देवाचे नामस्मरण करावे अशा काही सद्‌‍ आचरणानेदेखील आपले आरोग्य टिकून राहते.
  • यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यानसारख्या योगसाधनेचा स्वतः पालकांनी आचरण करावे व त्याचबरोबर मुलांना आचरण करण्यास प्रवृत्त करावे. त्याने शारीरिक, मानसिक, सामाजिक व आध्यात्मिक आरोग्य लाभेल.