योगसाधना- 685, अंतरंगयोग- 271
- डॉ. सीताकांत घाणेकर
आम्हीदेखील भक्ती करतो, पण आपली देवावर तेवढी श्रद्धा आहे का? आम्ही संपूर्ण समर्पित होतो का? आपली भक्ती निरपेक्ष, निराकांक्ष, निस्वार्थी आहे का? भक्तीमागचे तत्त्वज्ञान आम्हाला समजले आहे का?
वृंदावनमध्ये घडलेल्या एका घटनेवर एक कथा वाचली ती अशी-
वृंदावनात एक बुजुर्ग व्यक्ती सेवा करताना दिसते. त्यांना सर्वजण ‘जज्जबाबा’ म्हणून ओळखतात. अनेकांना हा शब्द विरोधाभासी वाटतो. जज्ज आणि बाबा? चौकशी केल्यानंतर जे सत्य कळते ते ऐकले की मन थक्क होते. अनेक विचार येतात. त्यांतील प्रमुख विचार म्हणजे- ‘असे घडू शकते?’
गावात एक गरीब केवट होता. मुलीचे लग्न ठरले. केवटाकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून त्याने गावच्या शेटजीकडून पैसे उधार घेतले- व्याजाने. लग्न थाटात, आनंदात पार पडले.
केवट अत्यंत धार्मिक, प्रामाणिक, सत्याने चालणारा सज्जन होता. स्वतःला जमेल तसे त्याने शेटजीचे ऋण फेडले. पण थोड्याच दिवसांनी आश्चर्य म्हणजे शेटजींनी त्याच्यावर कोर्टात खटला भरला की त्याने आपले पैसे परत केले नाहीत!
केवटाला कोर्टात बोलावले गेले. त्याने सांगितले की, “मी थोडे थोडे करून व्याजासहित शेटजींचे सर्व पैसे परत केले आहेत.” अशावेळी साक्षीदार लागतो. न्यायाधीश साहेबांनी विचारल्यावर केवट म्हणाला, “माझा साक्षीदार एकच- बांके बिहारी.” न्यायाधीशांनी दुसरी तारीख दिली आणि त्याचवेळी पोलिसांना सांगितले की, “ह्या बांके बिहारीला समन्स पाठवा!”
पोलिस सगळीकडे फिरले पण त्या गावात त्या नावाची कुणीही व्यक्ती आढळली नाही. कोर्टाच्या तारखेप्रमाणे सर्वजण हजर झाले. न्यायाधीश साहेब न्यायालयात आल्यावर त्यांनी फर्मान सोडले की बांके बिहारीला साक्षीसाठी बोलवा. पण त्यांना तर त्या नावाची कुणीही व्यक्ती सापडली नव्हती. पण रोजच्या सवयीप्रमाणे पोलिसाने मोठ्याने आवाज दिला- “बांके बिहारी हाजीर हो…!”
तेवढ्यात दरवाजातून एक म्हातारी व्यक्ती कठड्यात येऊन उभी राहिली. सर्वांना आश्चर्य वाटले, विशेषकरून केवटाला व पोलिसांना. कारण त्यांना सत्य परिस्थिती माहीत होती.
त्या वृद्ध व्यक्तीला न्यायाधिकाऱ्यांनी विचारले, “केवटने जेव्हा पैसे परत केले तेव्हा तुम्ही शेटजीकडे साक्षीदार म्हणून होता? कारण शेटजी म्हणतात की केवटाने त्यांचे पैसे परत केले नाहीत. त्याचसाठी ही केस चालू आहे.”
बांके बिहारी म्हणाला, “सज्जसाहेब, पैसे परत केले त्यावेळी मी हजर होतो. शेटजीच्या डायरीमध्ये 330 पानावर तशी नोंददेखील आहे. तसेच केवटाचा अंगठासुद्धा आहे.”
शेटजींना आश्चर्य वाटले. ते काही बोलण्याआधीच न्यायाधीशानी पोलिसांना शेटजींच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांची डायरी घेऊन यायला सांगितले.
पोलिसांनी डायरी आणली. बांके बिहारीने सांगितल्याप्रमाणे त्या पानावर तशी नोंद व अंगठा होता. न्यायाधीशाने केवटाला सोडून दिले व शेटजींना चेतावणी दिली की, “गरिबांचा असा गैरफायदा घेऊ नये. व्यवहार चोख व सत्य असावेत. पुन्हा असे केलेस तर कडक शिक्षा केली जाईल.”
सर्वांना- केवट, पोलिस, शेटजी- आश्चर्य वाटले की हा बांके बिहारी कुठून आला? त्यावेळी पोलिसांनी सत्य गोष्ट सांगितली. न्यायाधीशांनी जेव्हा केवटाला विचारले, “हा बांके बिहारी राहतो कुठे?” तेव्हा त्या देवभक्त केवटाने भगवंताला हृदयापासून नमस्कार केला आणि म्हणाला, “बांके बिहारी मंदिरात असतो!” न्यायाधीशांनी पोलिसांना मंदिरारात जायला सांगितले. तिथे जाऊन त्यांनी पुजाऱ्याला बांके बिहारीबद्दल विचारले. पुजारी म्हणाला, “ह्या नावाची कुणीही व्यक्ती मंदिरात नाही. या मंदिरातील भगवंतालाच आम्ही ‘बांके बिहारी’ म्हणतो.” पोलिसांनी त्याप्रमाणे न्यायाधीशांना सत्य परिस्थिती सांगितली.
न्यायाधीश सज्जन आणि धार्मिक होते. त्यांनी डोळे बंद केले तेव्हा त्यांना भगवंताचे दर्शन झाले. त्यांना देवाबद्दल कृतज्ञता वाटली की त्यांनी गरीब भक्ताला साक्षीदार बनून खोट्या गुन्ह्यापासून वाचवले. केवटाने तर मंदिरात जाऊन भगवंताला साष्टांग नमस्कार घातला. देवाचे उपकार मानले. त्याची श्रद्धा आणखी दृढ झाली.
न्यायाधीश घरी आले. त्यांनी पत्नीला ही अलौकिक घटना सांगितली. तिलादेखील आश्चर्य वाटले. पण न्यायाधीश रडायला लागले. पत्नीने कारण विचारले तेव्हा ते म्हणाले, “कोर्टामध्ये जेव्हा भगवंत आले तेव्हा मी त्यांना कठड्यात उभे केले व मी वर बसलो. मी त्यांना उत्तर काय देणार?”
पत्नीने समजावले की, ती वृद्ध व्यक्ती स्वतः भगवंत असणार अशी तुम्हाला कल्पनादेखील नव्हती. त्यामुळे तो अपराध अथवा पाप नाही!
न्यायाधीश अत्यंत भावनाप्रधान होते. त्यांनी मंदिरात जाऊन देवाला साष्टांग नमस्कार केला. क्षमा मागितली. एवढेच नव्हे तर निवृत्त झाल्यावर वृंदावनाला भगवंताच्या सेवेत राहिले. यामुळेच त्यांना सर्वजण ‘जज्जबाबा’ म्हणतात.
आम्हीदेखील भक्ती करतो, पण आपली देवावर तेवढी श्रद्धा आहे का? आम्ही संपूर्ण समर्पित होतो का? आपली भक्ती निरपेक्ष, निराकांक्ष, निस्वार्थी आहे का? भक्तीमागचे तत्त्वज्ञान आम्हाला समजले आहे का? आपली भक्ती भीतीपोटी तर नाही ना?
खरी भक्ती भावापोटी असते. शास्त्रकार म्हणूनच म्हणतात- ‘देव भावाचा भुकेला’ किंवा ‘मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव.’ कर्मकांडात्मक भक्तीमध्ये भाव नसतो.
आपण थोर, श्रेष्ठ भक्तांच्या कथा वाचतो, ऐकतो.
- संत नामदेवानी दिलेला नैवेद्य विठ्ठलाने ग्रहण केला.
- गोरा कुंभाराने मातीत गाढलेले मूल भगवंताने जिवंत केले.
- संत नामदेव व चार भावंडे भिंतीवर बसून अहंकारी चांगदेवाला भेटायला गेली.
- भगवंत श्रीखंड्या बनून संत एकनाथाच्या घरी नोकरी करीत होता.
- संत मीराबाईने भगवंतावरील विश्वासामुळे तिला दिलेले विष प्राशन केले.
- द्रौपदीला श्रीकृष्णाने वस्त्रे पुरवली.
अशा अनेक भावपूर्ण कथा.
येथे मुख्य मुद्दा म्हणजे, आपली भक्ती भावपूर्ण असायला हवी. त्यात संपूर्ण शरणागती हवी. भगवंतावर फक्त विश्वास नाही तर अतूट श्रद्धा हवी की संकटाच्या वेळी तो माझ्या मदतीला येईल. शास्त्रशुद्ध योगसाधना म्हणूनच आवश्यक आहे.