माजी मुख्यमंत्री आतिशी विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या असतील. रविवारी झालेल्या आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. अरविंद केजरीवाल यांच्याव्यतिरिक्त पक्षाचे सर्व 22 आमदार बैठकीला उपस्थित होते.
दिल्ली विधानसभेचे अधिवेशन आज 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ते 27 फेब्रुवारीपर्यंत चालेल. 26 तारखेला शिवरात्रीमुळे सुट्टी असेल. पहिल्या दिवशी नवीन आमदार शपथ घेतील. हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली त्यांना शपथ देतील.
यानंतर सभापती आणि उपसभापतींची निवड होईल. रोहिणी येथील भाजप आमदार विजेंद्र गुप्ता हे विधानसभा अध्यक्ष होतील हे जवळजवळ निश्चित आहे. विजेंद्र गुप्ता यांनी, कॅगचे सर्व 14 प्रलंबित अहवाल 25 फेब्रुवारी रोजी विधानसभेत सादर केले जातील. ‘आप’ सरकारच्या चुकीच्या दारू धोरणामुळे दिल्लीला 2026 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
दरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी, 21 फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री आतिशी आणि त्यांच्या मंत्र्यांच्या वैयक्तिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले. याशिवाय, आतिशी सरकारने इतर ठिकाणी नियुक्त झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ त्यांच्या मूळ विभागात हजर राहण्यास सांगितले होते.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी, शपथ घेतल्यानंतर लगेचच, पहिल्या दिवशी, आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि आम्ही आयुष्मान भारत योजनेला मंजुरी दिली, जी ‘आप’ने थांबवली होती. आता आपण दिल्लीची चिंता करू आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली दिल्लीला त्याचे हक्क मिळतील असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री रेखा गुप्तांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल रविवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. शनिवारी त्याआधी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. शुक्रवारी त्या राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना भेटायला आल्या होत्या. यानंतर शहा यांनी सोशल मीडियावर आज मी दिल्लीच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना त्यांच्या नवीन जबाबदारीबद्दल अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर आणि लोककल्याणकारी धोरणांवर दिल्लीतील जनतेने दाखवलेला विश्वास कायम ठेवून, मुख्यमंत्री म्हणून तुमचा कार्यकाळ निश्चितच दिल्लीला नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि लोकांच्या सर्व आशा आणि आकांक्षा पूर्ण करेल असे म्हटले आहे.