जयवंत दळवी दर्शन ः एक इंद्रधनुषी महोत्सव

0
3
  • अनुप प्रियोळकर

मराठी साहित्यातील चतुरस्र व्यक्तिमत्त्व जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा तीन दिवसांचा महोत्सव नुकताच फोंड्याच्या राजीव गांधी कला मंदिरात पार पडला. त्याचा धावता वृत्तांत-

ज्येष्ठ नाटककार, कथाकार व कादंबरीकार म्हणून मराठी साहित्यविश्वाला परिचित असलेले श्री. जयवंत द्वारकानाथ दळवी यांचे जन्मशताब्दी वर्ष 14 ऑगस्ट 2024 पासून सुरू झाले. गोमंतभूमीत हडफडे- बार्देश येथे त्यांचा जन्म. केंकरे कुटुंब हे त्यांचे आजोळ. बालपण व शालेय शिक्षण आरवली- शिरोडा येथे झाले. इयत्ता दहावीनंतर बहुतांशी आयुष्य मुंबई शहरात गेले. दळवींची मराठी विश्वाला खरी ओळख ‘नाटककार दळवी’ म्हणून झाली. दळवी हे मराठी विश्वाला मिळालेले एक लेणे आहे, असे संबोधल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये.
उणेपुरे 70 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या दळवींचे साहित्य हे विविधांंगी पैलूंनी नटलेले. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाला साजेल व मराठी रसिकांच्या मनात काहीकाळ त्यांचे स्मरण राहील असा एखादा कार्यक्रम घडवून आणावा, अशी इच्छा मनात रूंजी घालू लागली. सृजन संवाद- गोवा संस्थेच्या मासिक बैठकीत या कार्यक्रमाच्या प्रस्तावाला सर्वानुमते मान्यता घेऊन कार्यक्रम आखणीस सुरुवात केली. दळवींचे सुपुत्र श्री. गिरीश दळवी यांच्याशी संपर्क साधून या कार्यक्रमाची इच्छा व्यक्त केली व त्यांची अनुमतीही मिळवली.

ज्या घरात दळवींचे बालपण व प्रौढत्व गेले अशा आरवलीच्या मूळ घरात प्रारंभीचा कार्यक्रम करण्याचे ठरविण्यात आले. आरवलीच्या ‘वेतोबा’चे दर्शन घेऊन त्यांचा पुतण्या श्री. सचिन दळवी यांच्या सहकार्याने 14 ऑगस्ट 2024 रोजी त्यांच्या समवयस्क लोकांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाची नांदी करण्यात आली. दळवींची जन्मभूमी गोमंतक आणि त्यांचे कुलदैवत मंगेशी येथील श्री मंगेश. दळवींच्या काही नाटकांचे, कथा व कादंबऱ्यांचे लेखन मंगेश देवालयाच्या प्रांगणातील जुन्या इमारतीत घडून आले. सृजनशील अशा कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी माझे मार्गदर्शक व अत्यंत जवळचे स्नेही, साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय कुवळेकर यांच्या सहकार्याने कार्यक्रमाच्या आखणीला सुरुवात केली. कार्यक्रम आयोजनामागे प्रमुख विचार होता तो म्हणजे, या कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप न देता लेखक, साहित्यिक म्हणून त्यांच्या संपूर्ण प्रवासातील कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणे!
दळवींना भूतलावरचा प्रवास संपून आज 30 वर्षे पूर्ण झाली. त्यांच्याशी निकटचा संबंध असलेल्या व्यक्ती केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या राहिल्या असतील. दळवींच्या साहित्याची व्यापकता बहुआयामी असल्याने त्यासंबंधीचा कार्यक्रम एका दिवसात मावणारा नव्हता. त्यामुळे किमान तीन दिवस त्यांची नाटकं, कथा व कादंबऱ्या अशा विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या कार्यक्रमाला ‘जयवंत दळवी दर्शन- एक इंद्रधनुषी महोत्सव’ हे शीर्षक सयुक्तिक वाटले. महोत्सवाच्या औपचारिक उद्घाटनाच्या आधी पुणे येथील ‘मॅजेस्टिक प्रकाशन’तर्फे आयोजित पुस्तक प्रदर्शनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तिन्ही दिवस पुस्तकप्रेमींनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे कार्यक्रमाची शोभा आणखीन वाढली. समारोहाच्या औपचारिक उद्घाटनानंतर दळवीलिखित ‘बॅरिस्टर’ या नाटकाचा प्रयोग कळंगुट येथील ‘कालिका’ नाट्यसंस्थेने अतिशय उत्कृष्टपणे सादर केला. तिन्ही दिवस या सोहळ्यात ज्या व्यक्तींचा त्यांच्या लेखनाशी व साहित्याशी जवळून संबंध आला अशा अनेक मान्यवरांना त्यात सामावून घेतले. त्यामध्ये ज्येष्ठ नाटककार श्री. सुरेश खरे, ‘मॅजेस्टिक प्रकाशन’चे संचालक श्री. अशोक कोठावळे, प्रथितयश दिग्दर्शक श्री. वामन केंद्रे, ज्येष्ठ कलाकार सौ. स्वाती चिटणीस, श्री. संजय मोने, श्री. शैलेश दातार, श्री. सतीश जकातदार, श्री. राजेश दामले, गोवास्थित डॉ. अजय वैद्य, सिद्धी उपाध्ये अशा कलावंत व साहित्यिकांनी कार्यक्रमास हजेरी लावली. या तिन्ही दिवसांच्या कार्यक्रमाला साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार श्री. विजय कुवळेकर अध्यक्ष म्हणून लाभले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू श्री. गिरीश दळवी (दळवी यांचे सुपुत्र) यांनी तिन्ही दिवस लावलेल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाने एक मोठी उंची गाठली. पिता-पुत्रामध्ये अत्यंत प्रकर्षाने जाणवणारे साम्य म्हणजे दोघांनाही व्यासपीठावरून बोलताना छाती धडधडल्यासारखी होते. पुण्याहून निघायच्या आधी गिरीश यांनी मला विचारले होते की, आपल्याला तिन्ही दिवस बोलावे लागणार का? आणि बोलायचेच असेल तर किती वेळ? तिन्ही दिवसांच्या भाषणाची मनात व कागदावर रेखाटनी करूनच ते गोव्यात आले होते. गिरीश हे व्यवसायाने चार्टर्ड अकौंटंट असल्याने त्यांची अधिक जवळीक आकड्यांशी. पण एका प्रतिभावंत वडिलांच्या छत्रछायेखाली त्यांची जडणघडण झाल्याने त्यांचा जीवनप्रवास हा कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा! संवेदनशील माणूस या विषयावर बोलताना त्यांचं मन भरून आल्याचं जाणवलं. त्यांच्या एकंदरीत बोलण्यात- जयवंत दळवी यांचं एक लेखक म्हणून साहित्यक्षेत्रातील स्थान व त्यांची इतर साहित्यिकांशी असलेली जवळीक, याहीपेक्षा त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींशी झालेला संवाद, घडलेले गमतीदार व गंभीर प्रसंग यावर त्यांनी प्रकाश टाकला. ते सांगतात- “बाबांना एकांत आवडायचा. त्याचबरोबर त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सूक्ष्म असं निरीक्षण असायचं. त्यांना मासे व माशांचे वेगवेगळे प्रकार अतिशय प्रिय होते. म्हणूनच कार्यालयात जाताना आईने त्यांना भरून दिलेला जेवणाचा डबा आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर बसून ते वाटून चवीने खायचे. त्यांना स्वतःला व त्यांच्याबरोबर असलेल्यांनाही तिखट व झणझणीत मांसाहारी जेवणाचा आस्वाद घ्यायला आवडायचे. त्यांच्या मत्स्यप्रेमामुळे दादरच्या मासळी बाजारात त्यांना ‘घाऱ्या दादा’ म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या परिचित अशा कोळिणी त्यांच्यासाठी आधीच चांगली मासळी बाजूला काढून ठेवायच्या. कष्टाळू व आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या विक्रेत्यांबद्दल त्यांना विशेष कणव होती. याच गोष्टीसाठी त्यांनी एके दिवशी एका वृद्ध भाजीविक्रेतीकडून 50 मेथीच्या चुड्या विकत आणल्या व आईला सांगितले की, विक्रीसाठी बसलेल्या त्या वृद्ध महिलेला अधिक त्रास जाणवू नये म्हणून मी त्या विकत घेतल्या, तू त्या इतरांना वाटून टाक! तसेच एक शाळकरी मुलगा लिंबू विकण्यासाठी बसत होता. त्याला शाळेची फी भरण्यासाठी मदत व्हावी म्हणून दररोज ते 15-20 लिंबू विकत आणायचे. हेतू एकच, त्या मुलाला शिक्षणाच्या प्रवासात अडथळे येऊ नयेत. आपल्या ‘युसीस’मधील नोकरीच्या कार्यकाळात त्यांनी अनेक नामवंत साहित्यिकांना वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचा हात दिला, पण कुठेही त्याची वाच्यता केली नाही. आणीबाणीच्या काळात सरकारकडून दिलेला साहित्यिक पुरस्कार परत करण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखविले होते. ज्या साहित्यिकांना व परिचित अशा इतरांना अटक होऊन तुरुंगात डांबले गेले, त्यांच्या कुटुंबीयांना आपल्यापरीने बाबांनी मदत केली.”
अशा अनेक वेगवेगळ्या प्रसंगांतून आपल्यासोबत इतरांचेही जीवन सुखी व्हावे असा दळवींच्या ठायी असलेला परोपकाराचा विचार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू दाखवतो.

‘ठणठणपाळ’ या नावाने त्यांनी जवळजवळ वीस वर्षे सदर चालवले. त्यामधून अनेक साहित्यिकांच्या टोप्या उडवल्या. परंतु त्यामध्ये क्लेश व कटूपणा कुठेही नव्हता. एक निखळ आनंद सामावलेला होता. त्यामुळे ‘ठणठणपाळ’ वाचण्यासही मॅजेस्टिकचा ‘ललित’ हा अंक प्रसिद्ध होता. या सदराचे लेखक कोण हे उजेडात यायला वाचकांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली. देव या संकल्पनेवर त्यांचा अगदी गाढा विश्वास नव्हता; परंतु आरवलीचा वेतोबा रात्री गावात फिरून संपूर्ण गावातील लोकांचे रक्षण करतो यावर त्यांचा दृढ विश्वास होता. या व अशा अनेक कौटुंबिक विषयांवर गिरीश अगदी भरभरून बोलले. मात्र गिरीश यांच्या आई- सौभाग्यवती ‘उमा’- या फार श्रद्धाळू होत्या. पूजा-अर्चा व स्तोत्र पठणात त्या नेहमी मग्न असत. दळवी कधी त्यांच्या श्रद्धेच्या आड आले नाहीत. त्यांचे आरवली गावावर व तिकडच्या प्रेमळ अशा माणसांवर अधिक प्रेम व लोभ. त्यांच्या अखेरच्या काळात त्यांना भेटायला येणाऱ्या अनेकांजवळ त्यांनी आरवलीला येऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकले नाहीत. याची चुरचूर मात्र त्यांच्याएवढीच आरवली गावातील जयाकाका यांच्यासारख्या अनेकांच्या मनांना लागून राहिली.

आपल्या भाषणात गिरीश यांनी एका वेगळ्याच प्रसंगाचा उल्लेख केल्यामुळे सर्व सभागृह सद्गदित होऊन गेले. सन 1992 मध्ये गिरीश नोकरीनिमित्त सौदी अरेबियात होते. 1993 मध्ये काही दिवसांच्या सुट्टीवर ते भारतात आले होते. दळवींचे डायलेसिस आठवड्यावरून तीन दिवसांवर आले होते. त्यांना त्यांच्या अंतिम प्रवासाची चाहूल लागल्यासारखे जाणवत होते. गिरीश यांच्या त्या भेटीत त्यांनी त्याला त्या देशाच्या प्रवासाबद्दल अधिक माहिती विचारली असता गिरीश यांनी त्यांना सांगितले की गुरुवार व शुक्रवार या दोन दिवस त्या देशात कार्यालयीन कामकाजाला सुट्टी असते, त्यामुळे देशांतरासाठी परवानगी मिळत नाही. त्यावेळी दळवी सहज बोलून गेले, असा नियम असेल तर आपल्याला हे दोन दिवस सोडून मरण यायला हवे. गिरीश मग सहज हसत बोलून गेले की, या दोन दिवसांची जरा काळजी घ्या. पण नियतीच्या मनात पूर्वसंकल्पित दिवस आणि वेळ नियोजित असल्याने दळवींनी शुक्रवारी पहाटे अंतिम श्वास घेतला. जे घडू नये तेच घडले! देशांतर्गत प्रवासासाठी सुट्टी न मिळाल्यामुळे आपण त्यांना मंत्राग्नी द्यायला पोहोचू शकलो नाही ही खंत आयुष्यभरासाठी गिरीशना लागून राहिली.
यावेळी दृकश्राव्य कार्यक्रमामधून दळवींच्या वेगवेगळ्या साहित्यकृतींचा थोडक्यात आढावा घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर नाटककार श्री. सुरेश खरे, साहित्यिक व पत्रकार श्री. विजय कुवळेकर, ‘मॅजेस्टिक’चे प्रकाशक श्री. अशोक कोठावळे, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक श्री. वामन केंद्रे यांनी दळवींबाबत अनेक प्रसंग कथन केले. त्यांच्या निवडक कथा व नाटकं याचं मान्यवरांनी अत्यंत प्रभावीपणे अभिवाचन करून कार्यक्रमात रंगत आणली व दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेवटच्या दिवशीच्या कार्यक्रमात श्री. अशोक कोठावळे यांनी आपल्या वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर दळवींनी दिलेला भक्कम आधार व वेळोवेळी केलेल्या सूचना, ज्यांमुळे ‘मॅजेस्टिक प्रकाशन’चा डोलारा व वसा पुढे नेण्यास आपल्याला भक्कम आधार लाभला असे सांगितले. ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे यांनी आपण दिग्दर्शित केलेल्या नाटकांच्या अनुभवांची उजळणी केली. ‘नातीगोती’ या नाटकावरती शेवटच्या अंकात प्रेक्षकांना व वेगळ्या क्षमतेच्या मुलांच्या पालकांना योग्य असा संदेश देण्यासाठी नऊ वेळा बदल करण्यात आला व अंतिमतः दहाव्या वेळेस नाटकाचा अनुरूप असा शेवट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
समारोपाच्या भाषणात सर्व मान्यवरांनी ‘सृजन संवाद -गोवा’ या संस्थेने प्रथितयश अशा या लेखकाला वाहिलेली श्रद्धांजली व त्यांचे स्मरण यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल तोंड भरून कौतुक केले व आपणाला त्यात सहभागी करून घेतल्याबद्दल मनस्वी आभार मानले. समारोप समारंभातील सन्माननीय वक्ते ‘नवप्रभा’ दैनिकाचे संपादक श्री. परेश प्रभू यांनी दळवींच्या साहित्यकृतींचा थोडक्यात आढावा घेतला. संस्थेचे अध्यक्ष श्री. अनुप प्रियोळकर यांनी तीन दिवसीय कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व कलाकार, श्रोते व मंत्रिमहोदयांचे आभार व्यक्त केले व या कार्यक्रमातून मिळालेला सुखद असा आनंद अनंतकाळासाठी साठवून ठेवूया असे सांगून कार्यक्रमाची सांगता झाल्याचे जाहीर केले.