थिवीतील जमीन घोटाळ्याप्रकरणी म्हापसा प्रथमश्रेणी न्यायालयात 1364 पानी आरोपपत्र दाखल; 45 जणांच्या साक्ष नोंदवल्या
थिवी-बार्देश येथील जमीन घोटाळा प्रकरणात संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्याविरोधात गोवा पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयात 1364 पानांचे आरोपपत्र काल दाखल केले. एसआयटीने जमीन घोटाळा प्रकरणांत सिद्दिकीविरोधात एकूण हे तिसरे आरोपपत्र दाखल केले आहे.
थिवी येथील जमीन घोटाळा प्रकरणात सिद्दिकीबरोबरच त्याची पत्नी अफसाना खान आणि आसिफ सौदागर याच्यावर बनावट कागदपत्रे तयार करून जमीन बळकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
या जमीन घोटाळा प्रकरणी बार्देशचे उपनिबंधक अर्जुन शेट्ये यांनी म्हापसा पोलीस स्थानकात 10 जून 2022 मध्ये तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास म्हापसा पोलिसांनी केला होता. नंतर राज्य सरकारने जमीन घोटाळा प्रकरणांचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना केल्यानंतर सदर प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले होते.
थिवी-बार्देश येथील सर्व्हे क्रमांक 455 (7), 466 (6) आणि 466 (7) या जमिनींची बनावट कागदपत्रे तयार करत सरकारी यंत्रणेकडे ती सादर करून ती जमीन बळकावल्याचा आरोप आहे. सिद्दिकी खान व इतरांच्या विरोधात 1364 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणामध्ये 45 जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या आहेत. या प्रकरणामध्ये संशयितांना अटक केल्यानंतर 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी जमीन घोटाळ्याच्या अन्य दोन वेगवेगळ्या प्रकरणांत सिद्दिकीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रे दाखल झाली आहेत. आता हे तिसरे आरोपपत्र दाखल झाल्याने त्याच्या अडचणींत वाढ झाली आहे.
पहिल्या व्हिडिओमध्ये सिद्दिकी खानकडून ज्यांच्यावर आरोप त्यांची चौकशी का नाही?
अमित पालेकर यांचा सवाल; पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यास न्यायालयात जाणार
सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान पलायन प्रकरणी चौकशीच्या नावाखाली गोवा पोलिसांकडून आपली सतावणूक केली जात आहे. आपणाला चौकशीसाठी चार वेळा बोलाविण्यात आले आहे; मात्र सिद्दिकीने पहिल्या व्हिडिओमध्ये ज्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांची चौकशी का केली जात नाही, असा सवाल आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी काल जुने गोवे पोलीस स्थानकात चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
सिद्दिकी पलायन प्रकरणात जुने गोवे पोलिसांनी गुरुवारी अमित पालेकर यांना चौथ्यांदा चौकशीसाठी समन्स बजावले होते, त्यानुसार पालेकर हे काल चौकशीसाठी हजर झाले.
गोवा पोलिसांकडून यापुढे आपल्याला चौकशीसाठी नोटीस जारी केल्यास आपण थेट उच्च न्यायालयात धाव घेणार असून, निवृत्त न्यायाधीशांमार्फत या प्रकरणी चौकशीची मागणी करणार आहे. तसेच, सिद्दिकीने जारी केलेल्या दुसऱ्या व्हिडिओचा स्रोत शोधण्याची विनंती करणार आहे. आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, असे पालेकर म्हणाले.
सिद्दिकी पलायन प्रकरणात आपणाला अटक करा. आपण साबण, टूथब्रश, टूथपेस्ट घेऊनच आलेलो आहे. आपणाला पुन्हा पुन्हा नोटीस जारी करून आपली सतावणूक करू नका, असे तपास अधिकाऱ्याला सांगितल्याची माहिती ॲड. पालेकर यांनी दिली.
सिद्दिकीने जारी केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये राजकारणी, पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. त्या राजकारणी, पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी केली जात नाही. मात्र आत्तापर्यंत आपणाला चार वेळा चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. पलायनानंतर गोव्यात आणण्याच्या दोन-तीन दिवस अगोदर पोलिसांनी सिद्दिकीला अटक केली होती. इतके दिवस त्याच्या अटकेची माहिती लपवून का ठेवली? असा प्रश्न पालेकर यांनी उपस्थित केला. त्याने जारी केलेल्या दुसऱ्या व्हिडिओची चौकशी केली जात नाही, ही बाबही त्यांनी यावेळी नमूद केली.