क्रिकेट सट्टेबाजीप्रकरणी पिळर्णमध्ये तिघांना अटक

0
3

सध्या सुरू असलेल्या चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांसाठी बेकायदेशीर सट्टा घेणाऱ्या तीन संशयितांना पर्वरी पोलिसांनी काल रंगेहाथ अटक केली.
पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 20) रात्री बांगला देश आणि भारत यांच्यामधील सामन्यावर पिळर्ण येथील एका बंगल्यात सट्टा घेतला जात होता. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून तीन संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले. मकसूद मोदन (28, रा. गुजरात), आसिफभाई जियाउद्दिनभाई, (25, रा. गुजरात), रिझवान भाश (20, रा. गुजरात) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. छाप्यादरम्यान पोलिसांनी 4 मोबाईल संच, 1 लॅपटॉप, राउटर असा एकूण 1 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल परब, उपनिरीक्षक सिताराम मळीक, अरुण शिरोडकर, कॉन्स्टेबल महादेव नाईक, आकाश नाईक, नितेश गावडे आणि सिद्धेश नाईक यांनी सहभाग घेतला होता. संशयितांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायदा 3 व 4 अन्वये गुन्हा नोंदवला असून, पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहे.