राष्ट्रीय राजकारणात जाण्याची सध्या इच्छा नाही : मुख्यमंत्री

0
3

मुंबईतील आयडियाज ऑफ इंडिया परिषदेत वक्तव्य

आपली राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात जाण्याची सध्या इच्छा नाही. आपण गोव्यात कार्यरत आहे, तेच ठीक आहे. आम्हाला गोव्याचा आणखी विकास करायचा आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबईत एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीकडून आयोजित ‘आयडियाज ऑफ इंडिया’ परिषदेत घेतलेल्या मुलाखतीवेळी काल व्यक्त केले.

गोवा हे पर्यटकांसाठी सुरक्षित ठिकाण आहे. गोव्यात पर्यटकांचे नेहमीच आदराने स्वागत केले जाते. गोव्यात आल्यानंतर पर्यटकांनी काय खावे, कोणते कपडे परिधान करावे यावर आम्ही निर्बंध घालणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात पर्यटकांबाबत काही दुर्दैवी प्रकार घडले आहेत. तथापि, पोलीस यंत्रणेने त्वरित कारवाई केली आहे. राज्यात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास पोलीस पाच ते दहा मिनिटामध्ये घटनास्थळी पोहोचतात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्याला पुढील पंचवीस वर्षांसाठी आवश्यक असलेल्या 80 टक्के साधनसुविधा पूर्ण झालेल्या आहेत. गोव्यातील वाहतुकीच्या साधनसुविधांमध्ये वाढ झालेली आहे. गोव्यातील 40 टक्के टुरिस्ट टॅक्सी ॲप आधारित आहेत. पर्यटकांनी फसवणुकीला बळी पडता कामा नये. पर्यटकांची जास्त फसवणूक ही ऑनलाईन पद्धतीने होत आहे. त्यामुळे पर्यटकांनी कुठल्याही प्रकारचे व्यवहार करताना पूर्ण पडताळणी करण्याची गरज आहे, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.
गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे आणि चर्च नाही, तर ऐतिहासिक मंदिरे आणि आध्यात्मिक पर्यटन स्थळ देखील आहे. गोवा राज्य हे एक सुरक्षित पर्यटन केंद्र आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.