दिल्लीची धुरा

0
6

‘कालाय तस्मै नमः’ म्हणतात ते काही खोटे नाही. काळ कसा बदलेल आणि कोणाचे काय होईल काही सांगता येत नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच आमदारकीची माळ गळ्यात पडलेल्या रेखा गुप्ता काल दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या. दहा वर्षांपूर्वी ज्यांना मार्शलकरवी सभागृहाबाहेर घालवून देण्यात आले होते ते विजेंद्र गुप्ता आता दिल्लीचे सभापती बनले आहेत. दिल्ली म्हणजे आपलीच मक्तेदारी समजून राहिलेल्या आम आदमी पक्षाचे भलेभले नेते गाळात गेले आहेत. दिल्ली सर करून आणि तेथे एका महिलेला अनपेक्षितपणे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत विराजमान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकवार आपल्या निर्णयाधिकाराला दाखवून दिले आहे. कोणाच्या ध्यानीमनी नसलेली नावे मुख्यमंत्रिपदी आणून जनतेला चकित करण्याची मोदींची पद्धत आता नवी राहिलेली नाही. यापूर्वी वेळोवेळी विविध राज्यांच्या निवडणुकांनंतर अनपेक्षित व्यक्तींची नावे पुढे आणून त्यांना मुख्यमंत्रिपदावर विराजमान करताना पक्षातील ज्येष्ठांची तमा बाळगण्याची गरज भाजप नेतृत्वाला आजकाल वाटताना दिसत नाही, कारण पक्ष निवडून येण्यात ह्या जुन्या धेंडांचे जेवढे योगदान असते, त्याहून अधिक तो स्वतः मोदींचा करिष्मा असतो हे आता गुपीत राहिलेले नाही. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदावर योगी आदित्यनाथ यांना मोदींनी आणले तेव्हाच त्यांच्या ह्या अनपेक्षित धक्क्यांची चुणूक देशाला झाली होती. मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंह चौहानांना बाजूला ठेवून मोहन यादवांना त्यांचे यादव असणे विचारात घेऊन दिले गेलेले मुख्यमंत्रिपद असो, राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंचा पत्ता अलगद कापून तेथे ब्राह्मण असणाऱ्या भजनलाल शर्मांकडे मुख्यमंत्रिपदाची दिलेली धुरा असो किंवा छत्तीसगढमध्ये रमणसिंगांना बाजूला काढून विष्णुदेव साईंसारख्या वनवासी नेत्याकडे मुख्यमंत्रिपद देणे असो, मोदींची ही धक्कातंत्राची रणनीती आता देशाच्या परिचयाची झाली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदासाठी रेखा गुप्ता यांच्यासारख्या पहिल्यांदाच आमदार म्हणून विधानसभेची पायरी चढणाऱ्या महिला नेत्याची निवड करून हाच धक्का भाजपने सर्वांना दिला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी असलेल्या आम आदमी पक्षाच्या आतिषींच्या जागी एक महिला नेत्यालाच नेमणे भाजपला योग्य वाटले असावे. रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. एकेकाळी भाजपच्या सुषमा स्वराज दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या. त्यानंतर काँग्रेसने शीला दीक्षितांच्या गळ्यात ती माळ टाकली. आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना तुरुंगाची हवा खाणे अटळ बनल्यावर आतिषीच्या गळ्यात ती माळ आम आदमी पक्षाने टाकली होती. आता रेखा गुप्ता आल्या आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवताना पक्षातील अनेक ज्येष्ठ, अनुभवी नेत्यांना भाजपने दूर ठेवलेले दिसते. दोन वेळा लोकसभेचे खासदार राहिलेले, माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मांचे पुत्र परवेश वर्मा खुद्द केजरीवालांना पराभूत करून जायंट किलर ठरले होते. मुख्यमंत्रिपदाचे खरे तर ते प्रथम दावेदार होते, परंतु त्यांना ते पद दिले गेलेले नाही. केवळ मंत्रिपदावर त्यांना समाधान मानावे लागले आहे. कित्येक वर्षे नगरसेवक राहिलेले व नंतर आमदार बनलेले विजेंद्र गुप्ता हे विरोधी पक्षनेते होते. त्यांना मुख्यमंत्रिपदाऐवजी सभापतीपदी नेमण्यात आले आहे. ज्या तीन महिला यावेळी भाजपतर्फे निवडून आलेल्या आहेत, त्यातून रेखा गुप्तांची निवड झाली आहे. त्या पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेल्या असल्या तरी शालीमार बागमधून 2013 पासून आम आदमी पक्षाच्या आमदार असलेल्या वंदनाकुमारी यांना पराभूत करून जायंत किलर ठरलेल्या असल्याने त्यांच्या गळ्यात ही मुख्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. पंतप्रधान विदेश दौऱ्यावर असल्याने गेले दोन आठवडे ही निवड अडली होती, यावरून मुख्यमंत्रिपद निवडीमध्ये पक्षाच्या सांसदीय मंडळापेक्षा पंतप्रधानांच्या मताचे मोल किती आहे हे कळून चुकते. एका महिलेला मुख्यमंत्रिपदी बसवून भाजपने आम आदमी पक्षाच्या भात्यातील एक बाण निकामी करून टाकला आहे. रेखा गुप्ता यांच्यावर अर्थातच आता एक फार मोठी जबाबदारी आहे. आम आदमी पक्षाच्या कल्याणयोजनांपेक्षा उत्तम अशा कल्याणयोजना दिल्लीत त्यांना राबवून दाखवाव्या लागतील. भाजप नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवावा लागेल. दिल्ली हे एक आदर्श राज्य कसे बनवता येईल ह्याचा अहोरात्र विचार करून कार्यवाही करावी लागेल. मोठ्या महत्प्रयासांती आम आदमी पक्षाचा वरचष्मा सपशेल मोडीत काढून दिल्लीची ही सत्ता भाजपला गवसलेली आहे हे विसरून चालणार नाही. त्यांना आणि पक्षाला दिल्लीच्या जनतेचा विश्वास कमवावाच लागेल.