राज्य कर्मचारी निवड आयोगाने कनिष्ठ कारकून, वसुली कारकून जागांच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांना प्रमाणपत्रे सादर करण्याची सूचना केली आहे.
आयोगाने भरतीसाठी घेतलेल्या सीबीटी- 2 परीक्षेनंतर काही उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची फेरतपासणी केली जाणार आहे. आयोगाने यासंबंधीची नोटीस जारी केली आहे. फेरतपासणीसाठी काही उमेदवारांना प्रमाणपत्रे सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी प्रमाणपत्रे सादर न केल्यास ते पुढील सीबीटी परीक्षेसाठी अपात्र ठरणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. सदर नोटिसीमध्ये उमेदवाराचे नाव, आवश्यक असलेले प्रमाणपत्र नमूद करण्यात आले आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे.
राज्यातील 232 एलडीसी जागांसाठी सुमारे 22 हजार जणांनी अर्ज दाखल केले होते. एलडीसी पदासाठी सीबीटी- 2 परीक्षा घेऊन तिचा निकाल आयोगाने जारी केला आहे. सीबीटी- 2 परीक्षेतील गुणांवर सीबीटी- 3 परीक्षेसाठीची पात्रता यादी तयार करण्यात येणार आहे. ही यादी तयार करण्यापूर्वी आयोगाने काही उमेदवारांना प्रमाणपत्रे सादर करण्याची सूचना केली आहे. त्यात 77 उमेदवारांना अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. याशिवाय माजी सैनिक गटातील 84 उमेदवारांना निवृत्तीचे वा सेवेतून मुक्त केल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे. क्रीडापटूंच्या गटातील 20 उमेदवारांना क्रीडा प्रकारातील गुणवत्ता प्रमाणपत्र सादर करण्याची सूचना करण्यात आली आहे.