>> उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रवेश वर्मा यांची निवड
>> आज रामलीला मैदानावर होणार शपथविधी
दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. रेखा गुप्ता या आता दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री असणार आहेत. रेखा गुप्ता या दिल्लीतील शालीमार विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. पक्षाचे दोन निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि ओम प्रकाश धनखड यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावर कोण असावे यावर दिल्लीच्या आमदारांसोबत एकेक करून चर्चा केली, त्यानंतर दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांचे नाव जाहीर करण्यात आले असून त्या आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. उपमुख्यमंत्री म्हणून प्रवेश वर्मा यांची निवड करण्यात आली असून विजेंद्र गुप्ता हे विधानसभा अध्यक्ष असतील.
निवडणुकीच्या निकालानंतर 11 दिवसांनी काल बुधवारी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले.
आज शपथविधी
दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आज गुरुवारी (20 फेब्रुवारी) दुपारी 12:35 वाजता रामलीला मैदानावर होईल. दिल्लीच्या मुख्य सचिवांनी पाठवलेल्या निमंत्रणात मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांच्या शपथविधीचाही उल्लेख आहे. या कार्यक्रमाला 30 हजार पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आधीच मुख्यमंत्री निवडून आलेल्या आमदारांमधूनच असेल असे जाहीर केले होते.
महिला मुख्यमंत्री
दिल्लीत महिला मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडताना रेखा गुप्ता यांचे नाव पुढे केले. हा प्रस्ताव भाजपने स्वीकारला.
दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व केंद्रीय मंत्री, भाजप आणि एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.