लांबणीवर पडलेली गोवा मंत्रिमंडळाची फेररचना आता महिनाभराच्या आत होण्याची शक्यता काल भाजपमधील सूत्रांनी दै. नवप्रभाशी बोलताना व्यक्त केली. येत्या गोवा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी ही मंत्रिमंडळ फेररचना होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. भाजपचे गोवा प्रदेश अध्यक्ष दामू नाईक यांनी नुकताच दिल्लीचा दौरा करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या पार्श्वभूमीवर दै. नवप्रभाशी बोलताना भाजपमधील सूत्रांनी वरील माहिती दिली. दामू नाईक यांची पक्षाच्या केंद्रीय नेत्यांशी याबाबत सविस्तर चर्चा झालेली असून त्यांच्याकडून या मंत्रिमंडळ फेररचनेला हिरवा कंदिलही मिळालेला आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक, माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आदींनी यापूर्वीच वरील प्रकरणी केंद्रीय नेत्यांशी चर्चा केलेली आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.
सप्टेंबर 2022 ला काँग्रेस पक्षातून फुटून जे 8 आमदार भाजपमध्ये आले होते त्या आमदारांपैकी किमान दोन वजनदार मंत्र्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
एका वजनदार आमदाराला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्याविषयी काय सांगाल, असे विचारले असता सूत्रांनी याबाबत जास्त माहिती देण्यास नकार दिला.
विविध कारणांमुळे वेळोवेळी मंत्रिमंडळ फेररचना लांबणीवर पडली असे सांगून आता महिनाभरात ही फेररचना होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.