ओकांब- धारबांदोडा येथील दूधसागर नदीतून विक्रांत रावत (25, सध्या राहणारा तिस्क – उसगाव, मूळ उत्तराखंड) हा युवक बेपत्ता झाला आहे. त्या युवकाचा शोध संध्याकाळी उशिरापर्यंत घेण्यात आला पण तो सापडू शकला नाही.
प्राप्त माहितीनुसार रविवारी दुपारी दूधसागर नदीवर चौघेजण आंघोळीसाठी आले होते. आंघोळ करीत असताना पाण्याचा अंदाज आला नसल्याने विक्रांत रावत हा युवक बुडाला. त्याच्याबरोबर असलेल्या सहकाऱ्यांनी आरडाओरडा करून स्थानिक लोकांना पाचरण केले. त्यानंतर फोंडा पोलीस व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी उशिरापर्यंत बेपत्ता युवकाचा शोध घेतला. पण तो सापडू शकला नसल्याने शोधमोहीम बंद करण्यात आली. आज सोमवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार आहे.
उसगाव कामगाराला वाचवले
सोनारबाग- उसगाव येथील एका विहिरीची सफाई करणाऱ्या कामगाराची (नाव समजू शकले नाही) विहिरीत काम करत असताना तब्येत बिघडली. या कामगाराची तब्येत बिघडल्यानंतर स्थानिकांची धावपळ उडाली. स्थानिकांनी दोरीच्या साहाय्याने तब्येत बिघडलेल्या कामगाराला बाहेर काढून इस्पितळात दाखल केले. सदर कामगारावर उपचार सुरू असून त्याची स्थिती संध्याकाळी उशिरापर्यंत सुधारत अशल्याची माहिती इस्पितळातून प्राप्त झाली आहे.