पं. प्रभाकर कारेकर यांच्या निधनाने संगीतक्षितिजावरचा गोव्याचा आणखी एक लखलखता तारा निखळला. काहीशा सानुनासिक, परंतु खणखणीत, पल्लेदार आवाजातील आपल्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडणाऱ्या पं. कारेकरांनी शास्त्रीय गायक म्हणून शास्त्रीय संगीतामध्ये आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहेच, परंतु स्वतः रंगभूमीवरील गायक नट नसतानाही ‘प्रिये पहा’ सारख्या नाट्यगीतांना त्यांनी अजरामर केले, हेही त्यांचे योगदान न विसरता येणारे आहे. पं. सुरेश हळदणकर, पं. जितेंद्र अभिषेकी आणि पं. सी. आर. व्यास अशा तीन दिग्गज गुरूंच्या गायकीचा वारसा दैवयोगाने प्रभाकरजींना लाभला. पं. हळदणकर म्हणजे तडफदार गाणे. दुसरीकडे, अभिषेकीबुवांचे गाणे म्हणजे शांत, धीरगंभीर प्रपातच. पं. व्यास यांच्या राग, ठुमरी, भजन गायकीचा तर बाजच निराळा. ह्या तिन्ही शैलींचा मिलाफ कारेकरजींच्या गायकीत झाला होता. एकीकडे अहिरभैरव, वृंदावनी सारंगसारखे शास्त्रीय राग आळवत रसिकांना मुग्ध करून माना डोलायला लावणाऱ्या कारेकरांच्या ‘प्रिये पहा’ किंवा ‘नभ मेघांनी आक्रमिले’ सारख्या नाट्यगीतांनीही आपला चाहतावर्ग निर्माण केला आहे. कारेकरांचे घराणे मूळचे म्हापशाचे. त्यांचा जन्म मात्र कुंभारजुव्यात झाला. 1955 पर्यंत त्यांचे गोव्यात, मडगावात वास्तव्य होते. शाळेत वर्गात अभंग गुणगुणताना त्यांचा गोड गळा व्याकरण शिकवणाऱ्या पारकर मास्तरांनी हेरला आणि शाळेच्या स्नेहसंमेलनात त्यांना गायला लावले. ‘कुलवधू’ नाटकातली ‘मनरमणा मधुसुदना’ आणि ‘हेतू थोर साध्य होत’ ही दोन नाट्यपदे त्यांनी एवढ्या तडफेने गायिली की श्रोत्यांमधील प्रतिष्ठित व्यक्तींनी त्यांच्या वडिलांना, नारायण कारेकरांना मुलाला संगीत शिकवायची गळच घातली. संगीतशिक्षणासाठी त्यांना मुंबईला पाठवायला लावले. मुंबईत पं. हळदणकरांकडे गायनाची शिकवणी घ्यायला ते गेले तेव्हा ‘उद्यापासून आमच्याच घरी राहायला ये’ असा प्रेमळ आदेश गुरूंनी दिला. कारेकर दहा वर्षे त्यांच्याकडे राहून गाणे शिकले. हे शिक्षण चालू असतानाच गाण्याची मैफल स्वीकारल्याने गुरूंचा कोपही त्यांनी ओढवून घेतला. त्यावेळी मदतीला आले अभिषेकीबुवा. पुढची नऊ वर्षे अभिषेकीबुवांची गायकी कारेकरांच्या गळ्यावर नवा संस्कार करून गेली. पुढे पं. व्यासांमुळे गायकीची वेगळी शैलीही त्यांना आत्मसात करता आली. खरे तर विद्याधर गोखल्यांनी ‘मदनाची मंजिरी’ लिहिले, तेव्हा कारेकरांना त्यातील प्रमुख गायक नट बनण्याची संधी देऊ केली होती, परंतु संगीत नाटकात काम करण्यापेक्षा त्याचवेळी मिळालेली संगीत नाटक अकादमीची शिष्यवृत्ती त्यांनी महत्त्वाची मानली आणि नाट्यगीतांऐवजी शास्त्रीय संगीतासाठी जीवन वाहून घेण्याचा निर्णय घेतला. तो घेतला नसता तर प्रसाद सावकार, रामदास कामत यांच्या जोडीने गोव्याला आणखी एक गायक नट मिळाला असता. परंतु स्वतः नट नसले, तरी नाट्यगीते गाणे त्यांनी कधी कमीपणाचे मानले नाही. एचएमव्हीने त्यांची ध्वनिमुद्रिका काढली. पुण्यात सवाई गंधर्व महोत्सवात भल्या पहाटे अहिरभैरव आळवल्यानंतर त्यांनी रात्रीचा समय सरत असताना ‘प्रिये पहा’ची अशी काही तान ठोकली की महोत्सवात त्या गाण्याचीच चर्चा त्या वर्षी अधिक झाली. प्रभाकर कारेकर हे नाव त्यामुळे सर्वदूर पोहोचले. पुलंनी जेव्हा ‘शाकुंतल ते सौभद्र’ असा प्रयोग करायला घेतला, तेव्हा लालजी देसाईंनी पुलंना कारेकरांचे नाव सुचवले. तेथे ‘प्रिये पहा’ आणि ‘नच सुंदरी करू कोपा’ गाताना त्यांना भाऊसाहेब बांदोडकरांनी पाहिले. हा गोव्याचा मुलगा आहे हे कळताच भाऊंनी त्यांना गाडी पाठवून बोलवून घेतले आणि एका रसिक लोकनेत्याशी कारेकरांचे भावबंध जुळले. भाऊसाहेबांनी कारेकरांच्या अनेक मैफली आयोजित केल्या. पणजीच्या बाजारकर मंडळींच्या सत्यनारायण पुजेपासून म्हार्दोळच्या महालसेच्या कोजागरी उत्सवापर्यंत गाणारे कारेकर पुढे अमेरिका, दुबई, ईजिप्तमध्ये गाण्याचा कार्यक्रम करणारे पहिले मराठी गायक ठरले. एकदा त्यांचा रियाज ऐकून शेजारच्या सदनिकेत आलेले अभिनेते दिलीपकुमार त्यांना भेटायला आले आणि आपल्या मद्रास दौऱ्यात वारंवार त्यांचे गाणे ऐकायला सोबतच घेऊन गेले, आपल्या स्नेहाचे प्रतीक म्हणून तानपुऱ्याची जोडीही त्यांनी त्यांना भेट दिली होती. अशी उदंड लोकप्रियता लाभलेल्या ह्या थोर गायकातला अत्यंत विनम्र, विनयशील माणूस मात्र कधीच हरवला नाही. नवप्रभेने आपल्या ‘गोमंतगौरव’ विशेषांकात त्यांची एकदा मुलाखत घेतली होती, त्यानंतर ‘तुमच्या पुरवणीसारखी सुंदर पुरवणी मुंबईच्या दैनिकांनाही कधी काढता आलेली नाही’ अशी कौतुकाची दाद खास मुंबईहून फोन करून देण्याची दिलदारी ह्या महान गायकाने दाखवली होती हे कसे विसरायचे?