मंदिरांच्या विकासासाठी एकादश तीर्थ योजना

0
2

>> पर्यटन खात्यातर्फे योजना राबवणार

>> मंत्री रोहन खंवटे यांचा राज्यातील संपादकांशी वार्तालाप

गोवा सरकारच्या पर्यटन खात्यातर्फे राज्यात एकादश तीर्थ योजना राबवण्यात येणार असून उत्तर व दक्षिण गोव्यातील मंदिरांचा विकास केला जाणार आहे. नार्वे येथे गंगा आरतीच्या धर्तीवर घाटावर आरती सुरू केली जाईल, पर्वरीत टाऊन स्क्वेअर उभारला जाईल, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री रोहन खवटे यांनी काल दिली.
राज्यातील संपादकांशी अनौपचारिक वार्तालापात त्यांनी ही माहिती दिली. राज्यातील किनारी भागातील पर्यटन अधिक बळकट केले जाणार आहे. समुद्रकिनारा दक्षता ॲपच्या माध्यमातून बेकायदा गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. पर्यटन खात्याच्या मान्यतेशिवाय सुरू असलेले व्यवसाय बंद पाडले जाणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर बुडण्याच्या घटनांची नोंद केली जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

पर्यटकांसाठी हेल्पलाईन
पर्यटकांना मदत करण्यासाठी पर्यटन हेल्पलाईन क्रमांक 1364 कार्यान्वित केला आहे. या हेल्पलाईन क्रमांकांवरून 24 तास पर्यटकांना आवश्यक मार्गदर्शन केले जात आहे. पर्यटकांना हॉटेल बुकिंग आणि विविध सेवा उपलब्ध केल्या जात आहे. वन स्टॉप पर्यटन मार्गदर्शन म्हणून काम केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात पर्यटन खात्याकडून नवनवीन उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. पर्वरी टाऊन स्क्वेअरमध्ये म्युझिकल फाउंटन, व्हायब्रंट मार्केट आदींचा समावेश केला जाणार आहे. यामध्ये वाहन पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.
राज्यातील समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षेसाठी जादा पोलिसांची मागणी करण्यात आली आहे असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.

पर्यटकांच्या संख्येत वाढ

गोव्याच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचे मोठे योगदान असून 16.4 टक्के महसूल गोळा होत असून राज्यातील सुमारे 35 टक्के कामगार वर्ग पर्यटनावर अवलंबून आहेत. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. वर्ष 2024 मध्ये 4 लाख 67 हजार 911 विदेशी पर्यटकांनी भेट दिली. तर 99 लाख 41 हजार 285 देशी पर्यटकांनी भेट दिली. तर, 2023 मध्ये 4 लाख 52 हजार 702 विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली होती, असेही त्यांनी सांगितले.

शॅक भाड्याला

पर्यटन खात्याकडून स्थानिकांना व्यवसाय करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यावर शॅकसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते. तथापि, स्थानिक व्यावसायिकांकडून शॅक भाडेपट्टीवर दिले जात आहेत. उत्तर गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर 206 शॅक वितरित करण्यात आले असून त्यातील 109 शॅक भाडेपट्टीवर देण्यात आले आहेत. पर्यटन खात्याने 38 शॅकना नोटीस पाठविल्या आहेत, असेही पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.