सिद्दिकी खानशी काहीच संबंध नाही

0
3

>> उपसभापती ज्योशुआ डिसोझा, आमदार सरदेसाई यांच्याकडून स्पष्ट

राज्यातील जमीन बळकाव प्रकरणातील संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याच्याशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण गोवा विधानसभेचे उपसभापती ज्योशुआ डिसोझा आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी काल केले.

संशयित आरोपी सिद्दिकी खान याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे काही राजकीय नेते, सरकारी अधिकारी संशयाच्या घेऱ्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काल उपसभापती ज्योशुआ यांनी पोलीस मुख्यालयात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आपला सिद्दिकीशी काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
आरोपी सिद्दिकी याने जारी केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये राजकारणी व इतरांबरोबर उपसभापती, ज्योशुआ डिसोझा यांच्यावर आरोप केला आहे. सिद्दिकी याने व्हायरल झालेल्या आपल्या पहिल्या व्हिडिओतील आरोप खरे असल्याचे बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.

सरदेसाईंचे स्पष्टीकरण
संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याला आपण कधी भेटलो नाही. त्याच्याशी आपला कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण काल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष, आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डच्या मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत
केले. संशयित आरोपी सिद्दिकी याला पुन्हा एकदा त्याचे वक्तव्य बदलण्यास सांगितले जाण्याची भीती असून त्याच्या माध्यमातून आवाज उठविणाऱ्या विरोधकांना लक्ष केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही आमदार सरदेसाई यांनी सांगितले. राज्यातील बहुचर्चित सरकारी नोकर भरती घोटाळ्यावरील लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी सिद्दिकीचे पोलीस कोठडीतून पलायन प्रकरण घडवून आणण्यात आल्याची शंका आहे. राज्यात लोकशाहीचे धिंडवडे काढले जात आहेत. राज्यात लोकशाहीचे रक्षण करण्याची गरज आहे. यासाठी राज्यपालांची भेट घेणार आहे, असेही आमदार सरदेसाई यांनी सांगितले.