> > जमीन बळकावप्रकरणातील संशयित सिद्धिकी याचा आरोप
आपला व्हायरल झालेल्या दुसरा व्हिडिओ पोलिसांनी बंदुकीचा धाक दाखवून बनविला, असा खळबळजनक आरोप जमीन बळकाव प्रकरणातील संशयित आरोपी सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याने येथील न्यायालयाच्या बाहेर पत्रकारांशी बोलताना काल केला.
आपला व्हायरल झालेला पहिला व्हिडिओ आणि त्यात केलेले आरोप खरे आहेत. तर, दुसरा व्हिडिओ पोलिसांनी बळजबरीने बनविला आहे. पोलीस कोठडीतून पलायन केल्यानंतर 24 डिसेंबरला पुन्हा अटक केल्यावर दुसरा व्हिडिओ बनवला आहे. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात संशयित आरोपी सिद्दिकी याला एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी नेले जात असताना आणि न्यायालयातून बाहेर पडत असताना त्याने हे आरोप केले.
पोलिसांचा बळी ः पालेकर
पोलीस राजकीय दबावाला बळी पडत आहेत हे दुर्दैव आहे, अशी टीका आम आदमी पार्टीचे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे. पोलीस यंत्रणा राजकीय दबावाला बळी पडत आहेत. ते स्वतंत्रपणे काम करीत नसल्याचे ॲड. पालेकर यांनी म्हटले आहे. सुलेमान खानच्या व्हायरल दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲड. अमित पालेकर यांचे नाव घेऊन त्यांच्यावर आरोप करण्यात आलेला आहे.
आदेश राखीव
येथील पणजी जिल्हा व सत्र न्यायालयाने सिद्दिकी खान याला पोलीस कोठडी देण्याची मागणी करणाऱ्या एसआयटीने (जमीन बळकाव) दाखल केलेल्या अपिलावर 24 फेब्रुवारीसाठी आदेश राखून ठेवला आहे. जमीन बळकाव प्रकरणातील संशयित सिद्दिकी याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे. सध्या, संशयित सिद्दिकी खान हा न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपपत्र दाखल
जुने गोवा पोलिसांनी संशयित सिद्दिकी खान याच्याविरोधात रायबंदर येथील पोलीस कोठडीतून पलायन प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. संशयित सिद्दीकी खान याने 12 डिसेंबर रोजी एका पोलीस शिपायाच्या मदतीने पोलीस कोठडीतून पळून केले.