मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या 38 व्या बैठकीत सुमारे 733 कोटी रुपये गुंतवणुकीच्या 9 प्रकल्पांना मान्यता काल देण्यात आली असून सुमारे 2319 जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
या बैठकीला उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे अध्यक्ष, उद्योगपती श्रीनिवास धेंपो व इतरांची उपस्थिती होती.
बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या नऊ प्रकल्पामध्ये फार्मास्युटिकल, मॅन्युफॅक्चरिंग, वेअरहाउसिंग, मशीन टूल्स मॅन्युफॅक्चरिंग आणि बेव्हरेज उत्पादन आदी प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांद्वारे जास्तीत जास्त नोकऱ्या स्थानिकांना निर्माण झाल्या आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी बैठकीत स्पष्ट केले. तसेच, उद्योग संघटनेच्या प्रतिनिधींना स्थानिकांना कौशल्य प्रशिक्षणासाठी समन्वय साधण्यास सांगण्यात आले आहे.
मंजूर केलेल्या प्रकल्पांमध्ये, प्रॉक्टर अँड गॅम्बलचा विस्तार आहे. त्याची उपकंपनी ‘जिलेट डायव्हर्सिफाइड ऑपरेशन्स प्रा. लिमिटेड मल्टी-व्हिटॅमिनचे गोळ्या आणि अन्न श्रेणीबद्ध सॉफ्टजेल कॅप्सूल उत्पादन करणार आहे. गोवा सरकारने लॉजिस्टिक क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे. मंडळाने मे मशीन्स अँड स्कॅफोल्डिंग प्रा. लि. राज्यात गोदान सुविधा स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. मंडळाने यापूर्वी मंजूर केलेला एक केपे विभागातील इको-टुरिझम प्रकल्प आता इंडियन हॉटेल्स कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे.