महाकुंभ मेळ्यासाठी गोव्यातील 1300 तीर्थयात्रेकरुंना घेऊन दुसरी विशेष रेलगाडी आज 13 फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्थानकावरुन प्रयागराजकडे प्रयाण करणार असल्याचे काल समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आज दि. 13 रोजी संध्याकाळी 4.40 वाजता मडगावहून सुटणारी ही रेलगाडी 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 6.30 वाजता प्रयागराज रेल्वेस्थानकावर पोचणार आहे. तर प्रयागराज येथून 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 12 वाजता ती मडगावात पोहोचणार आहे. या यात्रेला जाणाऱ्या सर्व यात्रेकरुंची नावे व इतर माहिती असलेली ओळखपत्रे समाजकल्याण खात्यातर्फे दिली जाणार असून ओळखपत्रे नसलेल्यांना रेल्वेत प्रवेश देण्यात येणार नसल्याचे ते म्हणाले. 18 वर्षाखालील व 60 वर्षांवरील कुणीही रेल्वेत प्रवेश करून तीर्थयात्रेसाठी गेल्यास त्यांना आर्थिक दंड ठोठावून नजीकच्या रेल्वे स्थानकावर उतरविले जाईल, असे फळदेसाई यानी स्पष्ट केले.