एलओसीजवळील स्फोटात 2 जवान शहीद

0
3

>> जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमधील घटना; 1 जवान गंभीर

जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) काल आयईडीचा स्फोट झाला, त्यात लष्करातील एक कॅप्टन आणि एक जवान शहीद झाला. याशिवाय आणखी एक जवान जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मंगळवारी दुपारी 3.30 च्या आसपास हा स्फोट झाला. सध्या परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराचे पथक नेहमीप्रमाणे भटाल भागात गस्त घालत होते. यादरम्यान एलओसीजवळ भीषण आयईडी स्फोट झाला. यात एका अधिकाऱ्यासह तीन जवान गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना हौतात्म्य आले, तर तिसऱ्याची प्रकृती चिंताजनक आहे. स्फोटानंतर लगेचच संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली. अखनूर सेक्टरमध्ये मोर्टार शेल सापडला, कालच या भागात लष्कराला एक मोर्टार शेल सापडला होता, जो बॉम्ब निकामी पथकाने निकामी केला. स्थानिकांना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास नामंदर गावाजवळील प्रताप कालव्यात हा मोर्टार शेल दिसला होता.

दरम्यान, सोमवारी कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळील कर्नाह भागात शोधमोहिमेदरम्यान सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त केला होता. त्या शोध मोहिमेदरम्यान, सुरक्षा दलांनी एके 47 रायफल, एके मॅगझिन, सायगा एमके रायफल, सायगा एमके मॅगझिन आणि 12 राउंड जप्त केले होते.