औद्योगिक वसाहतींमध्ये 100 कोटी खर्चून नवीन पायाभूत सुविधा

0
2

>> जीआयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांची माहिती

राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये सुमारे 100 कोटी रुपये खर्चून नवीन पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. औद्योगिक वसाहतींत व्हाईट टॉपिंगचे रस्ते तयार करण्यात येणार आहेत, अशी माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी जीआयडीसीच्या संचालक मंडळाच्या 394 बैठकीनंतर बोलताना येथे काल दिली.

जीआयडीसीच्या संचालक मंडळाची ही बैठक उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली पणजीत काल घेण्यात आली. या बैठकीला आयडीसीचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड, धेंपो उद्योगसमूहाचे अध्यक्ष तथा जीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक व इतरांची उपस्थिती होती.
राज्यातील औद्योगिक वाढ आणि विकासाला चालना देण्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ह्या समस्या सोडविण्यासाठी विविध प्रकल्पांचे प्रस्ताव तयार केले आहेत. त्यात औद्योगिक वसाहतींमध्ये सांडपाणी निचरा प्रकल्प, कचरा प्रकल्प, रस्त्यांची दुरुस्ती व इतर साधन सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतींमध्ये व्हाईट टॉपिंगचे रस्ते करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार व्हाईट टॉपिंग पद्धतीने तयार करण्यात येणारे रस्ते किमान 25 वर्षे खराब होणार नाहीत, असेही आलेक्स रेजिनाल्ड यांनी सांगितले.