डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत सत्तेत विराजमान आल्यापासून जगभरात अनेक समीकरणे बदलली आहेत. त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला आहे. डॉलर मजबूत झाल्याने रुपयाची नीचांकी पातळीवर घसरण सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी काल भारतीय चलन रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 44 पैशांनी घसरला. या घसरणीनंतर रुपयाने नीचांकी पातळीवर पोहोचण्याचा नकोसा विक्रम केला. डॉलरच्या तुलनेत भारतीय चलनाचे मूल्य 87.94 पर्यंत घसरले.
रुपयाच्या घसरणीची अनेक कारणे आहेत; पण भारतीय चलनाचे व्यवस्थापन करण्यासाठी मोदी सरकारने तातडीने पावले उचलली नाहीत, तर ते मोठ्या संकटाचे कारण बनू शकते त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रुपयाच्या घसरणीचा ट्रेंड सुरू आहे. या महिन्याच्या सुरुवातीला 3 फेब्रुवारीला रुपयाने पहिल्यांदा 87 चा आकडा पार केला होता; पण यानंतरही रुपयाची घसरण थांबायचे नाव घेताना दिसत नाही. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारात, तो प्रति डॉलर 87.94 पर्यंत घसरला, जी रुपयाची सर्वकालीन नीचांकी पातळी ठरली. रुपयाची घसरण अशीच सुरू राहिली तर तो लवकर शंभरी पार करू शकतो, अशी भीती अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.