>> ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना सल्ला
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाच्या आठव्या आवृत्तीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत आगामी परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले. आपल्याकडे दिवसाचे फक्त 24 तास आहेत. काही लोक इतक्या वेळेत सर्वकाही करतात, तर काही जण अभ्यासासाठी वेळ मिळत नाही म्हणून रडत राहतात. खरेतर त्यांना त्यांचा वेळ कसा व्यवस्थापित करायचा हे माहीतच नाही. अशा परिस्थितीत वेळेचे व्यवस्थापन शिकणे खूप महत्वाचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
पहिली गोष्ट म्हणजे कुटुंब दबाव आणते. जर एखाद्या मुलाला कलाकार व्हायचे असेल तर त्याला इंजिनिअर व्हायला सांगितले जाते. पालकांनो, कृपया तुमच्या मुलांना समजून घ्या. त्यांना जाणून घ्या. त्यांच्या इच्छा समजून घ्या, त्यांच्या क्षमता समजून घ्या. त्याच्याकडे असलेली क्षमता पहा. कृपया त्याला मदत करा. जर त्यांना खेळात रस असेल तर स्पर्धा पाहण्यासाठी जा. पालक आणि शिक्षकांनी मुलांवरील दबाव कमी करावा, तो वाढवू नये, असे मोदी यावेळी म्हणाले.
बहुतेक लोक स्वतःशी स्पर्धा करत नाहीत, ते इतरांशी स्पर्धा करतात. जो स्वतःशी स्पर्धा करतो, त्याचा आत्मविश्वास कधीच तुटत नाही. तुम्ही नेहमीच स्वतःला आव्हान देत राहिले पाहिजे. बरेच लोक स्वतःच्या लढाया स्वतः लढत नाहीत. आयुष्यात मी काय बनू शकतो याचा कधी विचार केला आहे का? ते तुम्ही स्वतःला विचारले पाहिजे, असे मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी मुलांना परीक्षेच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी क्रिकेटचे उदाहरण दिले. क्रिकेट सामना सुरू असताना स्टेडियममधून आवाज येत असतात. कुणी सिक्स, कुणी फोर असे ओरडत असते. फलंदाजाला ते ऐकू येत असते का? तो समोरुन येणाऱ्या चेंडूकडे पाहात असतो. तो कसा खेळायचा त्याप्रमाणे तो खेळतो. लोकांचे ऐकून तो चौकार आणि षटकार मारु लागला तर तो बाद होईल. त्याचे संपूर्ण लक्ष समोरुन येणाऱ्या प्रत्येक चेंडूकडे असते. तुम्हीही कोण काय सांगत आहे यापेक्षा मला आज अभ्यास करायचा आहे, इतक्या वेळेत करायचा आहे. आज हा विषय, उद्या तो विषय असे केले, तर तुम्हीही परीक्षेला सहज सामोरे जाऊ शकता असा सल्लाही मोदींनी दिला.