नव्या-जुन्या पिढीतले अंतर अन्‌‍ वास्तव

0
2
  • रमेश सावईकर

जुन्या पिढीतल्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून नवीन पिढीला आपले करून घेतले पाहिजे, तर नव्या पिढीने एक पाऊल मागे घेऊन जुन्या पिढीशी जुळवून घेणे गरजेचे आहे. दोन पिढ्यांमधल्या अंतरामुळे आणि बदलत्या काळानुरूप जीवनपद्धतीमुळे ही आजची एक ज्वलंत समस्या बनली आहे.

जुन्या पिढीतील लोक व नव्या पिढीतील युवक यांच्यातील वैचारिक भिन्नता, जीवनशैलीतील आधुनिक बदल, साजश्रृंगार, मोठी स्वप्ने पाहण्याची वृत्ती, परंपरा-रूढींबाबतची अनास्था आदी बाबीत वाढती तफावत असल्याने उभय पिढींतील एकूण जीवनपद्धतीची दरी कालपरत्वे वाढत चालली आहे. हे का घडते? त्यास कोण जबाबदार आहे? याबाबत फारसा विचार न करता जुनी पिढी नव्या पिढीला दोष देऊन मोकळी होते. तर ‘तुमचे विचार जुनाट पद्धतीचे, बुरसट आणि रूढी-परंपरांचे विनाकारण स्तोम माजविणारे आहे,’ असे मतप्रदर्शन करून नवी पिढी मोकळी होते आणि आपल्या स्वतंत्र विचारपद्धतीनुसार बदललेल्या जीवनशैलीचे अनुकरण करीत जीवन व्यतित करणे पसंत करते. एकूण ही परिस्थिती पाहता उभय पिढींतले लोक दोषाचे खापर एकमेकांवर फोडून मोकळे होतात. पण लक्षात कोण घेतो हा मुख्य भेडसावणारा प्रश्न आहे.

जुन्या पिढीतल्या लोकांनी एक पाऊल पुढे टाकून नवीन पिढीला आपले करून घेतले पाहिजे, तर नव्या पिढीने एक पाऊल मागे घेऊन जुन्या पिढीशी जुळवून घेणे गरजेचे आहे. दोन पिढ्यांमधल्या अंतरामुळे आणि बदलत्या काळानुरूप जीवनपद्धतीमुळे ही आजची एक ज्वलंत समस्या बनली आहे.
या समस्येचा मारक परिणाम कुटुंबावर होत आहे याची जाणीव जुन्या पिढीतल्या जाणकार व्यक्तींनी अधिक बाळगायला हवी. नव्या पिढीबरोबर त्यांचे मनोबल खचू न देता सुसंवाद कसे घडतील याकरिता आपल्यातले चातुर्य पणाला लावले पाहिजे. प्रत्येक बाबतीत तुम्ही चुकता आहात, चुकीचा विचार करीत आहात, स्वैर स्वातंत्र्याचा अट्टहास धरीत आहात अशा स्वरूपाच्या विधानांचा पाढा नेहमीच वाचत राहिलात तर ते कोण सहन करणार? नवीन पिढी सळसळत्या रक्ताची व उमेदीने वावरणारी असल्याने जुन्या पिढीकडे कानाडोळा करणे अधिक पसंत करेल अन्‌‍ ते साहजिकच आहे. युवकांना आजकाल कोणी समजावूनच घेत नाही. जो तो उठसूट युवापिढीला दोष देण्यात आपली धन्यता मानतो. हे फार चुकीचे आहे.

नव्या पिढीत शिकण्याची जिद्द वाखाणण्याजोगी आहे. स्वतंत्रपणे जगून आपली स्वप्ने पुरी करण्याची त्यांची नेहमीच धडपड असते. ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता जास्त व बुद्ध्यांक अधिक असतो, त्यामुळे त्यांच्यात स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची क्षमता असते- आहे, हे जुन्या पिढीच्या लोकांना कोण समजावून सांगणार? कालानुरूप माणसाने उन्नत व्हायला हवे; नव्हे तो होत असतो. वैज्ञानिक डार्विनचा सिद्धांत हेच सांगतो- ‘सर्व्हायव्हल ऑफ दी फिटेस्ट!’
वेळप्रसंगी नव्या पिढीतल्या लोकांची निर्णयाबाबत द्विधा मनःस्थिती झाली तर जाणकार, अनुभवी म्हणून आपल्या ज्येष्ठांचा ते सल्ला घेऊ शकतात. आपणालाच सगळं काही समजतं, दुसरे काय म्हणतात, ते काय सल्ला देणार, याबाबत पूर्णपणे बेफिकीर व बिनधास्तपणे वावरणेही काहीवेळा चुकीचे ठरू शकते.
पूर्वी समाजात प्रलोभने कमीच होती. किंबहुना प्रलोभने नगण्यच होती असे म्हणावे लागेल. पण आजची परिस्थिती फार वेगळी आहे. आपल्या अवतीभवती स्वार्थी, लंपट, दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांची रेलचेल अधिक असते. जीवन उद्ध्वस्त करणारी व्यसने- दारू, सिगारेट, अमली पदार्थ इ. बाबीही मोठी प्रलोभने; माणसामधील आसक्ती वाढविणारी. त्यांच्या आहारी युवा पिढी केव्हा कळत-नकळत जाते हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. मन सैरभैर होते. बुद्धी काम करेनाशी होते. डोळ्यासमोर दिसतात ती फक्त प्रलोभने आणि त्यांच्याकडे ओढून नेणारी व्यसनाधीन माणसे.

अशावेळी युवा पिढीला सन्मार्गावरून पुढे नेणारी सज्जन माणसे त्यांना भेटणे गरजेचे आहे. चुकीचा मार्ग स्वीकारून पुढे गेलात तर भविष्य काळवंडेल, जीवन उद्ध्वस्त होईल, ही बाब कोणीतरी माया-ममतेने पटवून देणारी आपली माणसे त्याला भेटणे नि त्यांना योग्य मार्गावर आणण्याची जबाबदारी घेणारी माणसे- मग ते नातेवाईक असोत किंवा मित्र असोत- त्यांची गरज असते. पण असे योग चुकूनच जुळून येतात.

युवा पिढीवरील संस्कार कितीही प्रभावी असले तरी शक्तिशाली प्रलोभनांपुढे ते बोथट ठरतात. या पार्श्वभूमीवर युवा पिढीतली माणसे आपणापासून दुरावली किंवा दुखावली जाणार नाहीत याची काळजी ज्येष्ठांनी घ्यायला हवी. वेळीच युवा पिढीच्या कलाने आपण घेतले तर भविष्यातली संकटे टळू शकतात.
या पार्श्वभूमीवर विचार केला तर जुन्या पिढीच्या लोकांनी अधिक जबाबदारीने, चाणाक्षपणे आणि आपलेपणाने युवा पिढीबरोबर वागायला हवे. गरज किंवा आवश्यकता असेल तिथे चांगभल्यासाठी तडजोड स्वीकारली पाहिजे. आपला अहंकार जपण्याची नाहक कल्पना सोडून देऊन थोडे सज्ञानीपणाने वागायला शिकायला हवे, तरच कुटुंबात सुसंवाद घडतील, संपर्काचे जाळे विस्कळीत होणार नाही आणि भावनिक अनुबंधाच्या साखळीचे दुवे घट्ट राहतील.
आपण जुन्या पिढीतली माणसे. त्या काळानुरूप जीवनशैलीला अनुसरून आपण जीवन व्यतीत केले तसेच नव्या पिढीने करावे असा अट्टहास धरणे हे शहाणपणाचे लक्षण नव्हे. आपला पूर्वीचा पोशाख नव्या पिढीने स्वीकारावा अशी अपेक्षा बाळगणे फजूल आहे. सणा-सुदीला धर्मशास्त्रानुसार पेहराव करण्यास हरकत नाही. पण सुनेने नऊवारी लुगडे नेसावे, नथ घालावी, मुलाने धोतर नेसावे, कमीज घालावे अशी अपेक्षा ठेवणे हा निव्वळ खुळचटपणा आहे.
आज घाईगर्दीच्या जीवनात बस-रेल्वे, मोटरसायकल आदी वाहनांनी प्रवास करताना पोशाखही सुटसुटीत हवा याचे भान जुन्या पिढीने ठेवावे. कालानुरूप प्रत्येक बाबीत बदल हे अपेक्षित व घडत असतात त्यांना बिनतक्रार स्वीकारण्याची सवय ठेवावी. निदान तेवढा तरी सामंजस्यपणा जाणते म्हणविणाऱ्यांनी दाखवावा, म्हणजे सर्वांच्याच जीवनात सुरळीतपणा, स्वास्थ्य, सुख, समाधान येईल.

वाद-विवाद, भांडण-तंटे टाळा. जे पटत नाही त्याच्याशी पटवून घ्या. निदान विरोधी वक्तव्ये तरी करू नका, ज्यामुळे वाद-विवाद वाढतील. दुरावा निर्माण होऊन तो शिगेला पोचेल. भले जुन्या व नव्या पिढीतले ‘अंतर’ वाढत चालले असेलही, पण चातुर्याने वागा तरच निभाव लागेल. मना-मनांचे मनोमीलन महत्त्वाचे. एकतेची, सामंजस्याची, समतेची भावना महत्त्वाची आहे. आपण परिधान करीत असलेली वस्त्रे हा शरीरश्रृंगार आहे, तर चातुर्य हा मनाचा श्रृंगार आहे. म्हणून तर म्हटले आहे-
वस्त्रे श्रृंगारे शरीर। चातुर्ये श्रृंगारे अंतर॥
नव्या-जुन्या पिढीतल्या लोकांमधले वैचारिक अंतर वाढत जात असले तरी मानसिक अंतर (मन) एकरूप झाले तर सर्वांचे जीवन सुखी, फलदायी व यथार्थ होईल. नव्या पिढीतील लोकांच्या यशात आपला दडलेला सन्मान म्हणा किंवा गौरव आहे, याची जाणीव जुन्या पिढीतल्या लोकांनी ठेवली तर ती त्यांची वैचारिक प्रगल्भता ठरेल. आपलं जीवन संपत आलं. आपण आता परतीचे प्रवासी आहोत. नव्या पिढीतल्या लोकांचे अख्खे जीवन पुढे आहे. त्यांना एकाकी न पाडता साथ देणे, सन्मानाने नि आपलेपणाने वागविणे आणि त्यांचे यश हीच आपली कसोटी मानणे, यातच खरे शहाणपण आहे.